राऊतांनी या पत्राची सुरुवात मा. गृहमंत्री महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा सवाल विचारत केली आहे. आधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय आणि पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्यात हे चिंताजनक आहे. संबंधित खुनाची न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच वारीशे कुटुंबीयांना ५० लाखांचे अर्थसहाय्य सरकारने करावे, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली आहे.
तसेच कोकणात ४ फेब्रुवारी २०२३ ला आंगणेवाडी जत्रेत भाजपची जाहीरसभा झाली. त्या सभेत ठासून सांगितले की नाणार येथे रिफायनरी होणारच… कोण अडवतंय ते पाहू… व आपल्या वक्तव्यास २४ तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीशे यांची हत्या झाली… हा फक्त योगायोग समजावा का काही? असा सवालही संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
वारीशे मृत्यू प्रकरणात काही सत्ताधारी नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. वारीसे काही नेत्यांच्या डोळ्यांत खुपत होते. कोकणात रिफायनरीजवळ जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करू आणि वारीसे यांना न्याय मिळवून देऊ, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. सरकारच्या बेफीरीमुळे वारीसे यांची हत्या झाली आहे. हा सरकारने केलेला खून आहे. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब त्यांच्या कुटुंबीयांना किमान ५० लाखांची मदत द्यावी, असे संजय राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले.
पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका पत्रकाराला गाडीखालून चिरडून मारण्यात आलं. कोकणातल्या रिफायनरी विरुद्ध आपल्या कुवतीनुसार आवाज उठवत होते, लिखाण करत होते, असे ते पुढे म्हणाले. वारीसे प्रकरणावरून आपल्यावरही दबाव आला आहे. हे प्रकरण उचलू नका, यासाठी मला दोन वेळा फोन आलेत. आणि धमकी दिली गेली. पण मी भीत नाही, असे राऊत बोलले. वारीशे यांना आधीही धमक्या आल्या होत्या. आरोपीमागचे खरे सूत्रधार कोण? दोषींना पकडल्याशिवाय शांत बसणार नाही. या प्रकरणी केंद्रीय गृहखात्याने पथक पाठवून चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ज्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या पाठिमागचे खरे सूत्रधार कोण? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे. अटकेत असलेल्या आरोपी यापूर्वी सुपारी घेऊन किती जणांवर हल्ले केले आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? हेही गृहमंत्र्यांना माहिती आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
रिफायनरी विरोधकांचा रत्नागिरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी हत्यारा पंढरी आंबेरकर याला जन्मठेप किंवा फाशी द्यावी. आणि त्याच्या पाठीमागे जे खरे सूत्रधार आहेत, ते समोर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार, असा इशारा रिफायनरी विरोधकांनी दिला आहे. रिफायनरी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे आंदोलक म्हणाले.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News