नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन संशोधन संस्थेच्या हिंडेनबर्ग अहवालाचा कहर अजूनही सुरूच असून शुक्रवारी पुन्हा एकदा अदानी समूह चांगलाच हादरला. २४ जानेवारी रोजी अदानी समूहावर हिंडेनबर्गचा नकारात्मक अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअर्सला धक्के बसत आहेत. शुक्रवारी देखील यामध्ये आणखी भर पडली आणि समूहाचे तब्बल चार स्टॉक्स आपल्या नीचांकी पातळीवर खाली घसरले.

अदानी समूहाचे शेअर्सची स्थिती
शेअर बाजाराच्या शुक्रवारच्या सत्राखेरीस अदानी समूहातील तीन कंपन्यांचे समभाग – अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसचे समभाग ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. याशिवाय अदानी पॉवरचा समभागही पाच टक्क्यांनी घसरला असून इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उताराचा पाहायला मिळाला. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिकने कमी झाले आहे. याचा धक्का वैयक्तिक पातळीवर गौतम अदानी यांनाही बसला असून जगातील पहिल्या १० अब्जाधिशांमधील चौथ्या स्थानावरून ते टॉप-२० मधूनही बाहेर पडले आहेत.

अदानी प्रकरणी ‘सर्वोच्च’ सुनावणी सोमवारी, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी कोर्टाने SEBI कडे मागितले उत्तर
अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत
हिंडेनबर्गच्या अहवालाचा अदानी समूहाला चांगलाच महागात पडताना दिसत आहे. चालू आठवड्यातही बाजारात चढ-उतार होत असताना शेअर्सने निराश केले. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५ टाक्यांनीं ७२३.९० रुपयांवर घसरला, जो त्याचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. गेल्या वर्षी १९ एप्रिल रोजी शेअरने एका वर्षातील ३,०४८ रुपयाचा उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे अदानी ट्रान्समिशनच्या शेअरचा भावही पाच टक्क्यांनी घसरून ११८६.१५ रुपयांवर आला असून त्याची सर्वोच्च पातळी ४,२३८.५५ रुपये आहे. गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी स्टॉकने सर्वोच्च टप्पा गाठला होता. तसेच अदानी टोटल गॅसचा स्टॉकही शुक्रवारी लोअर सर्किटवर पोहोचला. या समभाग ५% घसरून १२५८.२५ रुपयांवर आला. तर ३,९९८.३५ रुपये हा या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक असून हिंडेनबर्गचा अहवाल समोर येण्याच्या एक दिवस आधी स्टॉकने पातळी गाठली होती.

मूडीजचा अदानी समूहाला धक्का, ‘या’ कंपन्याबाबत मोठा निर्णय, शेअर्सचे भाव पुन्हा कोसळणार?
घसरणीमागचे कारण काय?
निर्देशांक प्रदाता MSCI ने अदानी समूहाच्या चार समभागांची फ्री फ्लोट स्थिती कमी केली ज्यामुळे निर्देशांकातील त्यांचे वेटेज कमी होऊ शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. एमएससीआयने अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि एसीसीचा फ्री फ्लोट दर्जा कमी केला असून १ मार्चपासून बदल लागू होतील. फ्री फ्लोट एक सुरक्षिततेचा भाग आहे, जो आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांद्वारे व्यापारासाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here