गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात लेडी टॅक्सी चालक म्हणून ओळख असलेल्या तरुणीला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळाला असून तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील किरण रमेश कुर्मा (२५ वर्षे) हिची ओळख ‘लेडी टॅक्सी चालक’ आहे. वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून उदरनिर्वाहासाठी स्वतःचं प्रवासी वाहन चालवणं हे तिचं काम.

याचीच दखल घेऊन केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही तिचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेण्याच्या जिद्दीमुळे तिला आज विदेशात शिक्षण घ्यायची संधी चालून आली आहे.

किरणला आधीपासूनच उच्च शिक्षण घेण्याची जिद्द होती. हीच जिद्द उराशी बाळगून किरणने हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठात प्रवेश मिळवला. तेथे अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने २०१८ ला घरी परतून तिने वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्याचे ठरवलं. परंतु त्या भागात मुलीने प्रवासी वाहन चालवणं सोपं नव्हतं. घनदाट जंगल, डोंगराळ भाग असूनही न डगमगता किरणने तीन वर्षे टॅक्सी चालवली.

हजार रुपयांपासून सुरुवात आता ३० लाखांची उलाढाल,जालन्याच्या संजीवनी ताईंची प्रेरणादायी गोष्ट
सुरवातीला किरणच्या टॅक्सीतून प्रवास करायला लोक घाबरायचे, पण काही काळाने त्यांची भीती दूर झाली. एक तरुण मुलगी टॅक्सी चालवताना बघून अनेकांना आश्चर्य वाटायचं. पण किरणच्या मनात कधीच तिने निवडलेल्या क्षेत्राबद्दल साशंकता नव्हती. मात्र, मनात असलेली उच्च शिक्षणाची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मग तिने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागेल हे शोधण्यास सुरुवात केली.

दरम्यान, बीड येथे एकलव्याच्या कार्यशाळेत तिची भेट राजू केंद्रे आणि विशाल ठाकरे यांच्याशी झाली. त्यांनी तिला प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केलं. या जोरावर किरणने विदेशातील काही विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न चालू केले. २०२२ सप्टेंबरमध्ये काही विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षा दिल्या. यात तिला यश मिळालं. जगात ८६ वं मानांकन असलेल्या इंग्लंडमधील ‘लीड्स’ विद्यापीठात एमएससी ‘मार्केटिंग मॅनेजमेंट’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला.

प्रवाशांच्या लाडक्या लालपरीच्या चाव्या महिलांच्या हाती, बँकेतील सेल्स मॅनेजरची नोकरी सोडून ती ड्रायव्हिंग सीटवर
गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा सारख्या दुर्गम भागातून येऊन सुध्दा जिद्द आणि संघर्षाच्या बळावर मिळवलेल्या यशाबद्दल किरणचं सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु हा संघर्ष इथेच संपलेला नाही. प्रवेश तर मिळाला पण विद्यापीठाचे २७ लाख इतकं शुल्क कुठून भरावं हा नवा प्रश्न किरणपुढे उभा ठाकला आहे. त्यासाठी शासन किंवा एखाद्या संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळेल काय, याचा शोध सुरू आहे.

उच्च शिक्षण घेण्याचा जिद्दीमुळेच मला आज विदेशात शिक्षणाची संधी मिळाली आहे. परंतु २७ लाख रुपये शिक्षण शुल्क भरणं आमच्यापुढे आव्हान आहे. आपली जागा पक्की करण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किमान १ लाख ५० हजार रुपये भरणं आवश्यक आहे. जर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही रक्कम मिळाल्यास वरील रक्कम भरता येईल तसे प्रयत्न सुरू आहे. आता शासनाकडून शिष्यवृत्ती मिळेल ही अपेक्षा आहे, असं किरण सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here