Latur News Update : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील हासेगाव येथील एड्सग्रस्त मुलाचे संगोपन करणाऱ्या प्रकल्प ‘सेवालया’चे प्रमुख रवी बापटले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 21 महिन्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने बापटले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

लातूर जिल्ह्यातील हासेगव येथील सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी सेवालया शेजारी असलेल्या भीमाशंकर बावगे यांची शेती ताब्यात घेण्यासाठी दबाव निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अनेकदा सेवालयातील मुलांना हल्ला करण्यासाठी पाठवत असत असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. रवी बापटले आणि अन्य आठ साथीदारांनी  मे 2021 मध्ये  जीवघेणा हल्ला केला होता. यात कट्टा आणि अन्य प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता, अशी तक्रार भीमाशंकर बावगे यांनी पोलिसात दिली होती. मात्र याप्रकरणी औसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. शेवटी फिर्यादी बागवे यांनी औसा न्यायालयात दाद मागितली. सबळ पुरावा पाहून औसा न्यायालयाने रवी बापटले आणि अन्य आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून औसा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे.

कोण आहेत रवी बापटले ?

2006 पासून रवी बापटले हे पूर्ण वेळ एड्स बाधित मुलासांठी काम करत आहेत. यासाठी त्यांना काही दानशूर लोकांनी हासेगाव भागात शेत जमीन दान केली आहे. यातून त्यांनी तेथे सेवालय नावाचा आश्रम स्थापन केला आणि पूर्णवेळ एड्सबाधित लोकांसाठी काम करू लागले. यासाठी त्यांनी आजन्म अविवाहित राहण्याची शपथ देखील घेतली आहे. राज्यातील विविध भागातील आधारहीन एडसबधित मुलांचे ते संगोपन करत आहेत.  

काय आहे जमिनीचा वाद?

रवि बापटले संचलित सेवालयाच्या बाजूलाच भीमाशंकर बावगे यांची शिक्षण संस्था आणि त्यांची शेतजमीन आहे. 2007-08  पासून बावगे आणि रवी बापटले यांच्यात अनेक कारणांवरून वाद आहेत. अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देण्यात आल्या आहेत. यातून 21 महिन्यापूर्वी भीमाशंकर बावगे आणि रवी बापटले यांच्यात वाद झाला होता. रवी बापटले यांच्या विरोधात भीमाशंकर वावगे यांनी औसा पोलिसात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात भीमाशंकर बावगे यांनी औसा न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर रवी बापटले आणि अन्य आठ जणांविरुध्द न्यायालयाच्या आदेशाने भादवी 307 , 395 , 327, 397 , 147, 148, 149, 506 आणि 34 नुसार औसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.  

news reels reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here