वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन्ही मार्गांत सुमारे १०० किमी मार्ग मुंबई उपनगरी रेल्वे हद्दीत आहे. यावरून दर तीन मिनिटांनी लोकल धावतात. भारतीय रेल्वेवरील सर्वात तीव्र घाट म्हणून कसारा/लोणावळा ओळखला जातो. या घाटात ५० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस पूर्ण वेग क्षमतेने धावू शकलेली नाही, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेक इन इंडिया या उपक्रमातंर्गत वंदे भारतची १६० किमी प्रतितास या वेगाने धावण्यासाठी बांधणी झालेली आहे. एकीकडे जलद वेगाने धावणाऱ्या गाड्यांच्या निर्मितीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून यशस्वी पावले टाकण्यात येत असली, तरी या वेगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अर्थात रुळांच्या दर्जाची वृद्धी झालेली नाही. यामुळे रेल्वेप्रवास वेगाने होण्यासाठी वेगवान गाड्या आल्या खऱ्या, मात्र पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने वेगवान गाडीतून हळुवार प्रवास करतच प्रवाशांना पल्ला गाठावा लागणार असणार असल्याचे माहिती समोर आली आहे.
राजधानी एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेवरील प्रतिष्ठित रेल्वेगाडी म्हणून ओळखली जाते. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली राजधानीचा सरासरी वेग ताशी ९० किमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानीचा सरासरी वेग ताशी ८६ किमी इतका आहे.
या उपायांची गरज
– गाडीतून पडणाऱ्या प्रवाशांबरोबरच मुंबई लोकलमध्ये रोज दहा प्रवाशांचा रेल्वे रुळांवर मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी दरवाजे बंद एसी लोकलच्या फेऱ्या वाढवायला हव्या. रुळ ओलांडणे बंद केल्यास निम्मे मृत्यू कमी होणार आहेत.
– लोकल, मेल-एक्स्प्रेस, मालगाडी यांसाठी कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारादरम्यान केवळ दोनच मार्गिका आहेत. या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्राथमिकतेने पूर्ण होणे गरजेचे आहे.
– कल्याण स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना २०/३० किमी वेगाने गाड्या धावतात. मात्र, कल्याण यार्ड नूतनीकरणाचे काम वेगाने पूर्ण केल्यास गाड्या अधिक वेगाने गाड्या धावू शकतील.
वंदे भारत एक्स्प्रेस – सरासरी ताशी वेग
१ – (२२४३५/६) वाराणसी ते नवी दिल्ली ते वाराणसी – ९४
२ – (२२४३९/४०) नवी दिल्ली ते कटरा ते नवी दिल्ली – ८२
३ – (२०९०१/२) मुंबई सेंट्रल ते गांधी नगर ते मुंबई सेंट्रल – ८१
४ – (२२४४७/८) नवी दिल्ली ते अंब अंदौरा ते नवी दिल्ली – ७८
५ – (२०६०८/९) चेन्नई ते म्हैसूर ते चेन्नई – ७८
६ – (२०८२५/६) बिलासपूर ते नागपूर ते बिलासपूर – ७४
७ – ( २२३०१/२ ) हावडा ते जलपायगुडी ते हावडा – ७५
८ – (२०८३३/४) सिकंदराबाद ते विशाखापट्टणम ते विशाखापट्टणम – ७९
९ – ( २२२२५/६ ) मुंबई (सीएसएमटी) ते सोलापूर ते मुंबई – ६९
१० -( २२२२३/४ ) मुंबई ते शिर्डी ते मुंबई – ६५