मोठा भाऊ राजेशसोबत बसून अभिषेकनं लग्नासाठीच्या पाहुण्यांची यादी तयार केली. लग्नाच्या आदल्या दिवशी डीजे नाईट असेल. त्यासाठी मुंबई, गोव्याहून कलाकार बोलावू. माझे ४०० मित्र या कार्यक्रमाला येतील, असं अभिषेक म्हणाला होता. ४ तारखेला संध्याकाळी ६ च्या सुमारास अभिषेक घरी पोहोचला. त्यानं आईला आवाज दिला. आईनं त्याला पाणी दिलं आणि चहा करायला गेली. त्यानंतर पुढच्या दोनच मिनिटांत अभिषेकनं आईला मोठ्यानं हाक मारली.
अभिषेकची आई लगेच त्याच्याकडे पोहोचली. मला भीती वाटतेय. अस्वस्थ वाटतंय. मला लगेच रुग्णालयात दाखल करा, असं म्हणत अभिषेकनं आईला भावाला कॉल करण्यासाठी स्वत:चा मोबाईल दिला. भावानं अभिषेकला कारनं रुग्णालयात नेलं. संध्याकाळी ६.३० वाजता दोघे रुग्णालयात पोहोचले. अभिषेकला आणखी अस्वस्थ वाटत होतं.
डॉक्टरांनी सर्वप्रथम ईसीजी केला. तेव्हा सगळं नॉर्मल होतं. मात्र अभिषेकला अस्वस्थ वाटत होतं. अस्वस्थपणा कमी होत नव्हता. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करून ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र तरीही तो बेचैन होता. दोन-तीन ईसीजी होऊनही काहीच समजत नव्हतं. अखेर त्याला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र तरीही त्याची प्रकृती खालावत होती. ईसीजीमध्ये काहीच स्पष्ट समजत नव्हतं.
पाऊण तासानंतरही अभिषेकच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केलं. अवघ्या तासाभरात सगळंच संपलं होतं. अभिषेकच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. नातेवाईक, मित्र परिवाराला यावर विश्वास ठेवणं जड जात आहे.