वृत्तसंस्था, नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दिल्ली-दौसा-लालसोट या २४६ किमीच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, रविवारी उद्घाटन होणार आहे. हा टप्पा सुरू झाल्यावर दिल्लीपासून जयपूरपर्यंतचा प्रवास सुमारे साडेतीन तासांत होईल. सध्या या प्रवासासाठी पाच तास लागतात.
या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मोदी २४७ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचेही भूमिपूजन करणार आहेत. यासाठी पाच हजार ९४० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. ते दौसा येथून १८ हजार १०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. त्यानंतर बेंगळुरू येथील हवाई तळ येलहंकामध्ये ‘एअरो इंडिया २०२३’च्या १४व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी सोमवारी कर्नाटकला भेट देणार आहेत.