रमेश बैस यांची कारकीर्द
रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.
बैस यांच्यासमोरील आव्हान
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द प्रचंड वादळी ठरली. महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या वादग्रस्त पत्राचीही मोठी चर्चा झाली होती. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांवरून कोश्यारी यांचे महाविकास आघाडीसोबत प्रचंड मतभेद झाल्याचं समोर आलं होतं. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यातून कोश्यारी यांनी वाद ओढावून घेतला होता. या सगळ्या घडामोडींमुळे भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लावत असल्याचा आरोप होत होता. परिणामी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपचीही राजकीय कोंडी झाली होती. त्यामुळे कोश्यारी यांची गच्छंती अटळ मानली जात होती. आता त्यांच्या जागी राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रमेश बैस यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधकांना सोबत घेत राज्याच्या राजकीय गाडा सुरळीत ठेवण्याचं प्रमुख आव्हान असणार आहे.