Sanjay Raut in Mumbai | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याने ते अखेर महाराष्ट्रातून जाणार आहेत. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून वर्णी लागली आहे.

हायलाइट्स:
- राऊतांच्या मावळत्या राज्यपालांना कानपिचक्या
- १३ राज्यांमध्ये नवे राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती
केंद्र सरकारकडून १३ राज्यांमध्ये नवे राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या राज्यपालांची यादी रविवारी जाहीर झाली. यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्याजागी रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून वर्णी लागली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, कोश्यारी यांच्या काळात कधी नव्हे ते महाराष्ट्रातील जनता, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी संघटना राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. महाराष्ट्राने असे चित्र कधीही पाहिले नव्हते. भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून काम करताना मविआ सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारल्या. पण यासाठी मी राज्यपालांना दोष देत नाही, ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दबावाखाली काम करत होते. व्यक्ती वाईट नसते. पण त्यांना दबावाखाली काम करावे लागते तेव्हा त्यांचा भगतसिंह कोश्यारी होतो, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
छत्रपती शिवराय आणि सावित्रीबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांना तात्काळ पदावरून दूर करणे गरजेचे होते. पण भाजपने भगतसिंह कोश्यारी यांना शेवटपर्यंत पाठिशी घातले. त्यांनी कोश्यारींचा कार्यकाळ पूर्ण होऊन दिला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
नव्या राज्यपालांना राऊतांचा इशारा
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बैस आहेत की बायस, हे मला माहिती नाही. त्यांनी घटनेनुसार काम केले तर महाराष्ट्रात त्यांचे स्वागत आहे, आम्हीदेखील त्यांना सहकार्य करु, असे संजय राऊत यांनी म्हटले. रमेश बैस यांनी राजभवनाला भाजपचे मुख्यालय बनवू नये. हे सरकार घटनाबाह्य आहे, याचं भान राज्यपालांनी ठेवावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. मी रमेश बैस यांना ओळखतो. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये काम केले आहे. ते सुस्वभावी आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.