सिंधुदुर्ग: आर्थिक ताळमेळ बसत नसतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील कलावंत कलेचा वारसा नेटाने पुढे नेत असताना टिक-टॉकसारख्या माध्यमांमध्ये या कलेचे विडंबन केले जात असल्याने त्याविरुद्ध दशावतार कलावंतांनी एका सुरात आवाज उठवला आहे. टिक-टॉकवरील दशावताराचे विडंबन न थांबल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशारा दशावतार कलावंत, दशावतार मंडळे तसेच मुंबईस्थित दशावतार हितवर्धक नाट्य संस्थेने दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हे दशावतार कलेचे माहेरघर मानले जाते. सिंधुदुर्गात अनेक दिग्गज दशावतार कलावंत घडले. हे कलाकार विविध दशावतार नाट्य मंडळांच्या माध्यमातून दशावतार कलेची साधना करत आले आहेत. पौराणिक कथांचा आधार घेऊन त्यामाध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे काम दशावतारी नाटकांमधून केले जाते. दुसरीकडे नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांसाठी या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे. दशावताराला राजाश्रय मिळू शकलेला नसला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुणांना या माध्यमातून उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. नवी पिढी आर्थिक पाठबळ नसतानाही जोमाने ही कला पुढे नेण्यासाठी धडपडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी जत्रोत्सवांबरोबरच मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांतही मालवणी जत्रोत्सवांमध्ये या कलेचा डंका वाजू लागला आहे. मात्र, कोकणच्या मातीत नाळ असलेली ही कला अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत चालली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून टिक-टॉकवर दशावताराचे राजरोसपणे विडंबन सुरू आहे. दशावतारी नाटकातील एखादा प्रसंग चित्रीत करून त्याचे विडंबन करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ‘चल छय्या छय्या’, ‘सीने से तुम मेरे आके लग जाओ ना’ यांसारख्या बॉलिवूडमधील गाण्यांचा वापर करून विडंबनात्मक व्हिडिओ टिक-टॉकवर पोस्ट करण्यात आले आहेत. यावर दशावतार कलावंतांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. हे प्रकार न थांबल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली जातील, असा इशाराच दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबईचे अध्यक्ष आशिष गावडे, सचिव गौतम कदम आणि कोषाध्यक्ष रतन परब यांनी दिला आहे.

…तर कलावंतांनाही त्यातून मानधन मिळावे!

दशावतारी नाटकाचे मोबाइलमध्ये चित्रण करून ते स्वत:च्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करायचे व त्या माध्यमातून कमाई करायची, असे बरेच प्रकार उघडकीस आले आहेत. हे चित्रण युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्याआधी कोणतीही परवानगी घेतली जात नाही वा त्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईतून नाटक कंपनी वा कलावंतांना कोणताही वाटा दिला जात नसल्याने त्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सर्व कलावंत व दशावतार मंडळे करत असल्याचे सांगण्यात आले.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here