गेल्या दोन दशकांमधील सर्वात विनाशकारी संकट म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या या तुर्की आणि सिरीयातील भूकंपात आतापर्यंत २० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेघर आणि जखमी झाले आहेत. या सगळ्यात पामुक हा लहानसा कुत्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ पामुक ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता. त्याचा मानेखालचा भाग ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याला हालचाल करता येत नव्हती. बचाव पथकांकडून मदतकार्य सुरु असताना ढिगाऱ्याखाली कुत्रा अडकून पडला आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वप्रमथ वरचा ढिगारा दूर केला तेव्हा पामुकचे डोके बाहेर आले. हा कुत्रा जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला प्रथम पाणी पाजले. अनेक तासांपासून हा कुत्रा तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. बचाव पथकातील एका कर्मचाऱ्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन त्याला पाजले. यानंतर ढिगारा हळूहळू बाजुला करत पामुकची सुटका करण्यात आली. या कुत्र्याचा मालकही जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सध्या शेजारचे लोक या कुत्र्याची काळजी घेत आहेत.
एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले विजय कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. ते एका कामानिमित्त तुर्कीला गेले होते. यावेळी त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. भूकंप झाल्यानंतर हॉटेलची इमारत ढासळली. यामध्ये विजय कुमार यांचा मृत्यू झाला. बचाव पथकांना त्यांचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांचा चेहरा पूर्णपणे चिरडला गेला होता. मात्र, त्यांच्या हातावरील ‘ओम’च्या टॅटूने त्यांनी ओळख पटवण्यात आली.
मृतांचा आकडा २८ हजारच्या पल्याड
तुर्की आणि सिरीयात आतापर्यंत भूकंपातील मृतांचा आकडा २८ हजारापर्यंत पोहोचला आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हा आकडा दुप्पट म्हणजे ५० हजारापेक्षा जास्त होऊ शकतो. तुर्की आणि सिरीयात ६ फेब्रुवारीला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हा गेल्या दोन दशकांमधील सर्वाधिक मोठ्या तीव्रतेचा भूकंप असल्याचे सांगितले जाते.