याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी साडेसात वाजेच्या सुमारास सिन्नरच्या मिरगाव येथे बाळूमामाच्या मेंढ्या असलेल्या तेरा नंबरच्या पालखीचा मुक्काम होता. या पालखीसोबत असणारा सुमारे अडीचशे मेंढ्यांचा कळप पंचाळे शिवारातील एका शेतीच्या दिशेने रस्त्याने जात होता. शिंदेवाडी फाटा ते पंचाळेजवळ शहा बाजूकडून पंचाळेच्या दिशेने जाणाऱ्या भरदार वेगातील स्विफ्ट कार थेट कळपात घुसली. यावेळी चेंगराचेंगरी होऊन १२ ते १५ मेंढ्या मृत्युमूखी पडल्या तर काही जखमी झाल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत निषेध म्हणून रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला.
दरम्यान, मृत झालेल्या मेंढ्यांवर स्थानिक नागरिकांच्या मदतीने विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर जखमी मेंढ्यांवर खाजगी पशुवैद्यकाच्या मदतीने उपचार करण्यात आले आहेत. या भीषण अपघातात १२ ते १५ मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली, त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.