पुणे : सासूला मारहाण करण्यास सांगून स्वतःच्या घरात जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या सुनेला आणि तिच्या तीन साथीदारांना कोंढवा पोलिसांनी मिठानगर येथून अटक केली. सासू कौटुंबिक कारणावरून वेळोवेळी सुनेला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती. तसेच, तिचे सोन्याचे दागिणे हे तिला देत नव्हती. त्यामुळे सुनेने वचपा काढण्यासाठी या बनावाचे नियोजन केले.दोन फेब्रुवारीला एका महिलेच्या घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या तोंडावर टॉवेल गुंडाळून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि सुनेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनावणे, निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथक अधिकारी सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे हे शोध घेत होते. …म्हणून पोलिसांचा सुनेवर संशय बळावलागुन्हा घडला तेव्हा महिलेसोबत त्यांची सूनही त्या ठिकाणी होती. त्यामुळे पोलिसांनी सूनेकडे चौकशी केली. तेव्हा सुनेने तपासात उडवा उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे तपासादरम्यान पोलिसांचा सुनेवर संशय बळावला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाहणी केली असता, त्यामध्ये तीन व्यक्ती गुन्हा केल्यानंतर गुन्ह्याच्या घटनास्थळावरुन पळून जात असल्याचे दिसून आले. कासीम बुरानसाब नाईकवडी (वय २१), मेहबुबसाव अब्दुलसाब बदरजे (वय २५) आणि अब्दूल दस्तगीर मुल्ला (वय १९, तिघेही रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कर्नाटक गुलबर्गा येथून ताब्यात घेवून अटक केली. त्यांच्याकडे तपास केला असता सूनेच्या सांगण्यावरूनच हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सुनेला देखील अटक केली आहे. तिघा आरोपींकडून दोन सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सहायक निरीक्षक अनिल सुरवसे हे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here