आजची शेअर बाजाराची सुरुवात
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० शेअर्सचा सेन्सेक्स २९.८८ अंकांनी घसरून ६० हजार ६५२ च्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) ५० शेअर्सचा निफ्टी २.६० अंकांच्या किंचित वाढीसह १७,८५९ वर खुला झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १२ समभागात तेजी तर १८ शेअर्समध्ये घसरण होताना दिसली. याशिवाय निफ्टीचे ५० पैकी ३५ समभाग हिरव्या चिन्हात तर १५ समभाग घसरणीच्या लाल चिन्हासह व्यवहार करत आहेत.
प्री-ओपनिंगमध्ये बाजाराच्या वाटचाल
दरम्यान, बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टीच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवसाय होताना दिसला. सेन्सेक्स ८३.२७ अंक किंवा ०.१४% घसरून ६०,५९९ स्तरावर तर निफ्टी २० अंकांच्या म्हणजेच ०.११ टक्क्यांनी वाढून १७,८७६ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात मेटल, फार्मा, एफएमसीजी आणि हेल्थकेअर निर्देशांकात तेजी दिसून येत असताना आयटी, मीडिया, पीएसयू बँक, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि तेल आणि वायूचे समभाग आज घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करताना दिसत आहेत. तसेच बँकिंग शेअर्समध्येही घसरण होतेय.
अदानी शेअर्सची स्थिती काय?
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स मागील दोन आठवड्यांपासून जमिनीवर पडले असून आजही तसेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारात सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले. अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर आणि अदानी गॅस सुरुवातीच्या व्यापारातच ५ टक्क्यांनी घसरले असून अदानी एंटरप्रायझेस, अदानी विल्मर समभागात लाल चिन्हाने व्यवहार होत आहे.