२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आला आणि २७ जानेवारीपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागात घसरण सुरु झाली असून फक्त दहा दिवसांत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. पण गेल्या आठवड्यात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सने चांगली उसळी घेतली. त्याचवेळी, मागील वर्षापर्यंत, पेटीएम आणि पॉलिसी बाजारच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले पण या दोघांनी देखील गेल्या आठवड्यात चांगला फायदा नोंदवला.
अडचणीत सापडलेल्या अदानींच्या दोन समभागांनी दिला चांगला परतावा
मागील आठवड्यात अदानी एंटरप्रायझेसमध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. तर, गेल्या पाच दिवसांत २६ टक्के उसळी घेतली, पण हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर एका महिन्यात स्टॉक ५०% हून अधिक घसरला आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी स्टॉकची किंमत १६६३.९५ रुपये होते तर २४ जानेवारी २०२३ रोजी शेअर ३,४४२ रुपयाच्या पातळीवर होता. म्हणजेच हिंडेनबर्गच्या अहवालापूर्वी अदानी एंटरप्रायझेस आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला. मात्र, त्यांनतर मालामाल करणारा हा स्टॉक २४ जानेवारीनंतर कंगाल करू लागला आणि आता तो हळूहळू आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकत आहे.
याशिवाय अदानी पोर्ट्सने गेल्या पाच दिवसांत १७ टक्क्यांहून अधिक उसळी नोंदवली असून १३ जानेवारी २०२२ रोजी शेअर ७९४.६५ रुपयांवर होता तर आता ५८४ रुपयांवर घसरला आहे. तर एका महिन्यात स्टॉक २६% हून अधिक तुटला आहे.
पॉलिसीबाजार फास्ट ट्रॅकवर
पॉलिसीबाजारचे शेअर्स देखील गेल्या वर्षभरापासून नुकसान करत होता, पण मागील पाच दिवसांपासून शेअर आपल्या गुंतवणूकदारांना हसण्याची संधी देत आहे. मागील पाच दिवसांत शेअरने २० टक्क्यांहून अधिक उसळी असून स्टॉक ४२९.८० वरून ५१७ रुपयांपर्यंत वाढला आहे. १८ नोव्हेंबर २०२१ पासून स्टॉकमध्ये ६१% हून अधिक घसरण झाली आहे. म्हणजेच एकावेळी नुकसान करणारा शेअर आता गुंतवणूकदारांना कमाईची संधी देत आहे.
पेटीएमचा शेअर
भारतातील सर्वात मोठ्या IPO पैकी एक पेटीएमच्या शेअर्सनी बाजारातील गुंतवणूकदारांना सूचिबद्ध झाल्यापासून चांगलाच निराश केलं आहे. शुक्रवारी पेटीएमचे शेअर्स जवळपास ८ टक्क्यांनी घसरून ६५०.७५ रुपयांवर बंद झाले. मात्र, गेल्या पाच दिवसांत या स्टॉकने १९% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. दरम्यान, शेअरच्या किमतींबद्दल बोलायचे तर आतापर्यत शेअरमध्ये २२% हुन अधिक वाढ झाली असून गेल्या वर्षभरात त्यात सुमारे २५% घट झाली आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअर ४३८.३५ रुपयांवर घसरला असून गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरनंतर त्यात सुधार होताना दिसत असून शेअर ४४१.१० रुपयांवरून ६५०.७५ रुपयांवर पोहोचला आहे.
(नोट: येथे दिलेली माहिती केवळ स्टॉकच्या कामगिरीबद्दल आहे, तो गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जोखमीच्या अधीन असून गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)