Authored by चेतन भगत | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Feb 2023, 1:32 pm

Pandurang Sakpal Thackeray Camp: बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या पांडुरंग सपकाळ यांच्या जागी विभागप्रमुख म्हणून संतोष शिंदेंची नियुक्ती करण्यात आली आहे. अंतर्गत राजकारणातून बदल झाल्याची चर्चा आहे.

 

Uddhav Thackeray and Pandurang Sakpal
उद्धव ठाकरे आणि पांडुरंग सकपाळ

हायलाइट्स:

  • पांडुरंग सकपाळ हे प्रभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख होते
  • पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाचा खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक १२ च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी संतोष शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संतोष शिंदे हे विभागाचे उपाध्यक्ष होते. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पांडुरंग सकपाळ हे प्रभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख होते. मात्र, त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत ती संतोष शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षसंघटनेत करण्यात आलेला हा बदल पक्षासाठी फलदायी ठरणार का यामधून नाराजीची बीजं रोवली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते. शिवसेना पक्षाच्या पडत्या काळात दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात पांडुरंग सकपाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात पांडुरंग सकपाळ यांनी हटके पद्धतीने केलेल्या आंदोलनाचीही जोरदार चर्चा होती. पांडुरंग सकपाळ यांनी २०१९ मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांच्याकडे होती. इतक्या महत्त्वाच्या नेत्याकडून ठाकरे गटाने विभाग प्रमुखपद का काढून घेतले, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभागप्रमुख पदाच्या जबाबदारी संतोष शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यानंतर पांडुरंग सकपाळ यांना ठाकरे गटाकडून नवी जबाबदारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तसे घडल्यास पांडुरंग सकपाळ संघटनेत अडगळीत जाऊ शकतात. त्यामुळे पक्षनेतृत्त्वाने नवी जबाबदारी न सोपवल्यास पांडुरंग सकपाळ काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
ठाणे सोडाच, वरळीत जिंकतानाही आदित्य ठाकरेंना नाकीनऊ येणार; सचिन अहिर शिंदे गटाच्या वाटेवर?

पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाची किनार

दक्षिण मुंबईतील शिवसेना (ठाकरे गट) पक्षसंघटनेत तडकाफडकी बदल करण्यात आले आहेत. या सगळ्यामागे खासदार अरविंद सावंत यांचा हात असल्याची चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील जुन्या नेत्यांना बाजूला सारुन त्याजागी नव्या दमाच्या आणि स्वत:च्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा अरविंद सावंत यांचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटात खदखद वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या इतर भागांमधील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली होती. परंतु, मुंबईतील शिवसेनेची ताकद अद्याप अबाधित असल्याचे सांगितले जाते. मात्र, दक्षिण मुंबईतील खांदेपालटानंतर पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आल्यास ठाकरे गटात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here