वाशिम : मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने थोडी-थोडी वाढ होत होती. मात्र शनिवारी दरात पुन्हा घसरण बघायला मिळाली होती, त्यानंतर आज आठवड्याच्या सुरवातीलाच दरवाढ झाल्याचं दिसून आलं. आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ५०५० ते ५४०० इतका दर मिळाला. तर, सरासरी दर ५२७५ इतका होता. तर सोयाबीनची आवक ४५०० क्विंटल इतकी झाली आहे. शनिवारी वाशिमच्या बाजारात सोयाबीनला किमान ४६०० ते कमाल ५२७६ इतका दर मिळाला होता. मागील आठवड्यात सुरु झालेला दरवाढीचा ट्रेंड आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील कायम आहे. सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा करत असलेले अनेक शेतकरी सध्या संभ्रमावस्थेत आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीनचे दर सहा हजाराच्या आसपास गेलेले असतानांही मोठ्या दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस न आणता घरात साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र आधीच्या तुलनेत फारच कमी दर मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन विकावं की आणखी दरवाढीची प्रतीक्षा करावी अश्या संभ्रमावस्थेत आहेत.शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा राज्यात सोयाबीनला सध्या सरासरी ५२७५ ते कमाल ५४०० रुपये दर मिळत आहे. जो उत्पादन खर्चा पेक्षा फारच कमी आहे. त्यामळे शेतकऱ्यांना सहा महिने वाट पाहूनही निराशाच पदरी पडली आहे. उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी किमान सहा हजाराचे दर मिळणे आवश्यक असल्याचे मत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. तुरीच्या दरात मोठी वाढ ८ हजारांचा टप्पा ओलांडला कारंजालाड बाजार समितीत तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना आज समाधानकारक दर मिळाला आहे. तुरीला आज किमान ६८००, सरासरी ७५०० तर जास्तीजास्त ८१०० रुपयांचा दर मिळाला. १० फेब्रुवारीच्या तुलनेत तुरीच्या दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कारंजालाड बाजार समितीत तुरीचा दर वाढला असला तरी आवक मात्र घटली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला शनिवारी ७५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला होता. शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. तर, तुरीला ९ हजारांच्या आसपास दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च पाहता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here