करोनासंदर्भातल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असले तर काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला नाही. चीनसह अनेक देशांमध्ये करोनाची प्रकरणं वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने महिन्याभराआधीच काही नियम लागू केले होते. यानंतर आता यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. काय आहेत नवे नियम, पाहुयात…
– ७२ तासांपेक्षा जुना करोना चाचणी अहवाल वैध धरला जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
– यासोबतच चीनसह ६ देशांमधून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी करोना चाचणी अहवाल आणि ‘एअर फॅसिलिटी’ फॉर्म अपलोड करण्याचे नियम काढून टाकण्यात आले आहेत.
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे २ टक्के प्रवाशांची रँडम चाचणी करणे सुरू असणार आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून हे नियम लागू करण्यात आले आहेत.
– गेल्या काही दिवसांमध्ये अनेक देशांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली. यामुळे हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
– WHO ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २८ दिवसांमध्ये करोनाच्या प्रकरणात ८९ टक्क्यांनी घट झाली आहे.
– मध्यंतरी पुन्हा एकदा चीनमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्याचं बोललं जात होतं. पण आता या रुग्णांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे नियमांमध्येही मोठी सूट देण्यात आली आहे.
– दरम्यान, भारतातही करोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. रोज १०० हून कमी रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी देशामध्ये १२४ करोनाच्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.