या अपघातात डंपरवरील दोघांपैकी परमेश्वर प्रकाश आधारे हा डंपरखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच, केळीच्या वेफर्सच्या दुकानाजवळ चहा पिण्यासाठी थांबलेला एक जण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. तसेच, केळी वेफर्सच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई (वय-१९) ही तरूणीदेखील गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात याठिकाणी उभी असलेल्या एमएच ४१ बीबी २७३५ या क्रमाकांच्या दुचाकीचाही चुराडा झाला.
ज्या केळीच्या वेफर्सच्या दुकानावर जावून हा डंपर धडकला ते दुकान भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील संतोष भोई यांचे आहे. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह हा केळी वेफर्सच्या दुकानावर आहे. या अपघातात भोई यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर गंभीर जखमी झालेली अश्विनी भोई त्यांची मुलगी असून ती बारावीची विद्यार्थिनी आहे.
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होत आहे, मात्र या परीक्षेपूर्वी तिच्यावर अपघाताच्या रुपाने शारीरिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पहूर पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेल्या डंपरला बाजुला केला आणि गाडीखाली दबलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावांमधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.