नगरमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. नगर महापालिका हद्दीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आता वेगाने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तर दररोज तीन अंकी रुग्णसंख्या ही नगर जिल्ह्यामध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे करोना बाधितांचा एकूण आकडा झपाट्याने वाढत आहे. आज तर करोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या पुढे गेला आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात बाधितांच्या संख्येत २६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये ९७ , अँटीजेन चाचणीत २४ आणि खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १४० रुग्णांचा समावेश आहे. दररोज करोना बाधितांचा आकडा हा तीन अंकी येत असल्यामुळे प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या जास्तीतजास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तसेच अँटीजेन चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या पाहता त्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण जवळपास दीड टक्का एवढे आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या – जिल्हाधिकारी
‘करोना या आजारातून बऱ्या झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. ‘प्लाझ्मा थेरपीचा वापर करून जिल्ह्यातील इतर करोना बाधितांवर उपचार करता येतील. त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये जे करोना पॉझिटिव्ह झाले होते, व जे त्यामधून बरे होऊन घरी परतले आहेत, त्यांनी प्लाझ्मा दान करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे,’ असेही द्विवेदी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times