उत्तर प्रदेशातील बागपतमधील एका लग्न सोहळ्यात पनीर नसल्यामुळे मोठा वाद झाला. वधू पक्ष आणि वर पक्षातील काही मंडळींमध्ये झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. पोलिसांना लाठीचार्ज करुन वऱ्हाडी मंडळींना आवरतं घ्यावं लागलं.
कोतवालीमधील गुराना गावातील वरात बागपत शहरात पोहोचली. मात्र जेवणात पनीर नसल्याने आत्याचे मिस्टर आणि इतर काही वऱ्हाडी मंडळी नाराज झाली. त्यावरुन त्यांचा वेटर्सशी वाद झाला. त्यातच डीजेनेही वर पक्षातील मंडळींच्या आवडीची गाणी न लावल्याने त्यांच्या संतापात भरच पडली. वधू पक्षाने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र काका रुसून बसले.
शब्दाने शब्द वाढत गेला आणि भांडणाचं रुपांतर बघता बघता मारामारीत झालं. वधू आणि वर पक्षातील वऱ्हाड्यांनी एकमेकांना लाथा-बुक्के, बेल्ट यांनी मारहाण केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ट्विटरवर या व्हिडिओला दीड लाखांच्या घरात व्ह्यूज आणि अनेक शेअर्स मिळाले आहेत. या व्हिडिओत अनेक पुरुष एकमेकांशी हाणामारी करत असल्याचं दिसतंय.
पोलिसांनी या पैकी तीन ते चार जणांची धरपकड करुन त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. तिथे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आलं. मात्र लग्नातील पनीरवादावर अखेर तोडगा निघाल्याचं बोललं जातंय.
पाहा हाणामारीचा व्हिडिओ :
२०२० मध्ये बागपत येथील चाट विक्रेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओही अशाच प्रकारे सोशल मीडियावर बेफाम व्हायरल झाला होता.
प्रेमासाठी कायपण; इंटरनॅशनल लव्हस्टोरी, अमेरिकेच्या अँड्रूने श्रद्धासाठी थेट अमरावती गाठली