सावडाव गावातील तेलीवाडीतील जिल्हा परिषद केंद्रशाळा क्रमांक १ या प्राथमिक शाळेतीत तिसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांबाबत हा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास झरवाडी आणि पुजारीवाडी येथील सहा मुले एका धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणाहून तेलीवाडी शाळेत जात होती.
ही मुले शाळेपासून जवळ असलेल्या एका विहिरीजवळ थांबली होती. याच वेळी रस्त्यावर एका मोटार थांबली. त्यात दोघे जण होते. त्यांनी त्या मुलांना ‘तुम्हाला शाळेत सोडतो, गाडीत बसा’ असे सांगितले. मुले गाडीत बसायला तयार होईनात. त्यामुळे त्यातील एकाने चाकू दाखवत जबरदस्तीने त्यांना गाडीत बसवले.
संशयितांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते. संशयितांकडून मुलांच्या चेहऱ्यावर केसरी रंग लावला. तेथून मुलांना घेऊन ही गाडी सावडाव सडा येथे आली. पुढे जाण्याचा रस्ता त्यांना सापडला नाही. त्याच वेळी मुलांनी ओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी गाडीतील एकाला फोन आला. यामुळे त्याने गाडी थांबवली.
याच गडबडीत मुलांनी सुटका करून घेत समोरच असलेल्या डगरेवाडी शाळेच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. ही मुले शाळेच्या गणवेशात धावत असल्याचे डगरेवाडी शाळेचे शिक्षक अशोक साळुंखे, गौतम जाधव यांनी पाहिले. त्यांना हा प्रकार समजेना. त्यामुळे तातडीने दुचाकी घेऊन ते त्या मुलांच्या दिशेने आले. यावेळी मुलांनी सगळा प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर रंग असल्याचे दिसून आले.
त्यानंतर या शिक्षकांनी केंद्रशाळेतील शिक्षकांशी व सावडावचे उपसरपंच दत्ता काटे यांच्याशी संपर्क साधला आणि मुलांना शाळेत आणले. सावडावच्या सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे, माजी पंचायत समिती सदस्य परशुराम झगडे यांच्यासह ग्रामस्थ जमा झाले होते. यावेळी पोलिस सहाय्यक निरीक्षक सुप्रिया बगडे, मिलिंद देसाई यांच्यासह पोलिस दाखल झाले. त्यांनी मुलांचा जबाब घेतला व तपासला सुरुवात केली. उशिरापर्यंत तपास सुरू होता.
याबाबत येथील पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना विचारले असता, ही घटना ग्रामीण भागात घडली आहे. त्यामुळे काही पुरावे गोळा केले जात आहेत. मुले अज्ञान आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीवरून घटनेचा तपास सुरू आहे. ठोस पुरावे मिळाले तर तपास होईल. तसे पुरावे आम्ही शोधत आहोत. त्यानंतर दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी त्यांच्या अपहरणाचे नाट्य सुरू झाले, तेथेच त्या मुलांची दप्तरेही काढून टाकली. त्याचप्रमाणे मुलांना चाकूचा धाक दाखविण्यात आल्याचे मुलांनी सांगितले. सिंधुदुर्गात काही दिवसांपूर्वी मुले चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरली होती; मात्र पोलिसांनी या घटनांचा तपास करून या प्रकाराचा पोलखोल केला होता. आता सावडाव येथे हा प्रकार घडला असून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, सावडाव येथे घडलेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा नेमका प्रकार काय आहे, याबाबत पोलिसांनी तपास करावा. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, त्यामुळे पालकांत भीती निर्माण झाली आहे. हा प्रकार भीतीदायक असल्याने संशयितांना अटक झाली पाहिजे, असे यावेळी सावडाव सरपंच आर्या वारंग यांनी म्हटले आहे.
नाशिकमध्ये भाजपची कार्यकारिणीची बैठक; फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास, चर्चांना उधाण