परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील राहिवाशी नुजहत (वय ३७) यांचा बीड शहरातील बालेपीर येथील शेख आरीफ वजीर यांच्यासोबत २३ जानेवारी २००६ रोजी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर या दोघांचा परिवार चांगला सुरू होता. त्यांना दोन मुली आहे. त्यांचे वय १७ वर्षे आणि १५ वर्षे सध्या आहेत. या सुखी संसारात क्षुल्लक कारणांवरून सदरील दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाल्याने वर्ष २०१८ पासून नुजहत या दोन्ही मुलींसोबत त्यांच्या माहेरी राहू लागल्या. आपसांतील वाद वाढतच गेल्याने शेख अरिफ यांच्या पत्नीने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे पती, सासू-सासरे, दोन दीर, नणंद आणि तिचा नवरा यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन, पाथरी येथे हुंडा मागणे, मारहाण करणे व शिवीगाळ करण्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात दाखल गुन्ह्या रद्द करण्यासाठी शेख आरीफ व त्यांच्या नातेवाइकांनी ॲड. सईद एस शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. सदरील प्रकरणावर सुनावणीच्या वेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकीलांना आपसात तडजोडीचे प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दाम्पत्य, त्यांचे नातेवाइक, दोन्ही बाजूंचे वकील आणि सरकारी वकील यांची कोर्ट हॉलऐवजी न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायमूर्तीनी दांपत्य व त्यांच्या नातेवाइकांची बाजू ऐकून घेतले; तसेच विभक्त झाल्यापासून होत असलेल्या विविध समस्यांची माहितीही घेतली. न्यायमूर्तींनी या दोन्ही जणांमधील व त्यांच्या परिवारातील आपसातील गैरसमज दूर करून दोन्ही मुलींच्या भाविष्यासाठी पुन्हा एकत्र येण्यासाठी समजाविले. खंडपीठाचे दोन्ही न्यायमूर्तीं अत्यंत आपुलकीने समजावित असल्याचा मान राखत दाम्पत्य व त्यांच्या नातेवाइकांनी एकमेकांची चुका माफ करून आपसातील वाद मिटविला. ज्यामुळे खंडपीठाने पती व सासरच्या नातेवाइकांविरुद्धचा वर नमूद गुन्हा रद्द केला आहे.
सदरील प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सईद शेख यांनी बाजू मांडली. फिर्यादी पत्नीच्या वतीने ॲड. तबरेज कादरी आणि सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील ए. आर. काळे यांनी काम पाहिले.