बँक ऑफ महाराष्ट्राने एमसीएलआरमध्ये ०.३० टक्क्यांची वाढ केली आहे. एमसीएलआर वधारल्याने गृहकर्ज, कार कर्ज, वयक्तिक कर्ज आदी कर्जाचे हप्ते महाग झाले आहेत. कर्जाचा व्याजदर वाढीचा परिणाम सध्याच्या कर्जदारांना तसेच नवीन कर्जधारकांवरही होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचा एक वर्षाचा एमसीएलआर ८.४० टक्के
- बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार आता ओव्हरनाइट एमसीएलआर ७.५० टक्क्यांवरून ७.८० टक्के झाला आहे.
- एक महिन्याचा एमसीएलआर ७.७० टक्क्यांवरून ८% झाला आहे.
- तीन महिन्यांसाठी एमसीएलआर ७.९० टक्क्यांवरून ८.२० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
- सहा महिन्यांसाठी एमसीएलआर ८ टक्क्यांवरून ८.३०% झाला आहे.
- एक वर्षाचा एमसीएलआर ८.२० टक्क्यांवरून ८.४० टक्के झाला आहे.
- आरबीआयने रेपो दरात ०.२५ बेसिस पॉईंट्सची वाढ
- गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली. या वाढीनंतर रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.५० टक्के झाला आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या एमसीएलआरमध्ये वाढ
रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानेही एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसईवरवर उपलब्ध माहितीनुसार एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर १२ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. ओव्हरनाइट एमसीएलआर आता ७.८५ टक्क्यांवरून ७.९० टक्के झाला आहे. एका महिन्याचा एमसीएलआर ८.१५ टक्क्यांवरून ८.२० टक्के झाला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवरून ८.३० टक्के झाला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर ८.३५ टक्क्यांवरून ८.४० टक्के आणि एक वर्षाचा एमसीएलआर ८.५० टक्क्यांवरून ८.५५ टक्के करण्यात आला आहे.