झुरखेडा येथील रहिवासी कविता चौधरी यांची आत्या जळगाव शहरातील शिव कॉलनीत राहतात. आत्याच्या मुलाच्या हळदीचा सोमवारी कार्यक्रम होता. कविता चौधरी यांच्या शेजारी राहत असलेले विलास देवीदास चौधरी यांचे जळगावात कृषीकेंद्र आहे. ते दररोज दुचाकीने जळगावला ये जा करत असतात. त्यामुळे कविता चौधरी या सोमवारी विलास चौधरी सोबत दुचाकीवरुन जळगावला हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाल्या.
दुचाकीने येत असताना पाळधीच्या पुढे गोविंद हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या जी.जे-०३, बी.वाय-६८३१ या क्रमाकांच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार विलास चौधरी आणि कविता प्रशांत चौधरी हे रस्त्यावर फेकले गेले. यात दोन्ही पायावरुन डंपरचे चाक गेल्याने कविता चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
कविता चौधरी यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटना कळताच पाडळसरे, झुरखेडा आणि पाळधी येथील नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यावर पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसंच डंपर ताब्यात घेतला. डंपर चालक फरार झाला आहे.
आज कविता चौधरी यांच्या आत्याच्या मुलाचा विवाह सोहळा पडणार होता. मात्र कविता चौधरी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अगदी साधे पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मयत कविता चौधरी यांचं पाडळसरे येथील माहेर आहे. त्या कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरेचे पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या बहिण आहेत. कविता चौधरी यांच्या पश्चात पती, १४ वर्षांचा मुलगा सत्यम आणि १२ वर्षीय मुलगी भूमिका असा परिवार आहे.