नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड, डॉन लेन परिसरात टवाळक्या करणाऱ्या एका रोडरोमियोने तरूणीची छेड काढली. त्यानंतर या रोडरोमियोला सामोरे जात तरुणी व तिच्या आईने जाब विचारत चांगलीच अद्दल घडवली आहे. भर रस्त्यात या रोडरोमियोला तरुणी व तिच्या आईने चांगलाच चोप दिला. सोमवारी सव्वाचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
दरम्यान, तरुणी व तिच्या आईने या रोडरोमियोला लाथा बुक्क्यांनी चांगलाच चोप दिल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी संगितले. रोडरोमियोला तरुणी व तिच्या आईने देतानाचा हा व्हिडिओ तेथेच उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. माय-लेकीने रोडरोमियोला घडवलेल्या या अद्दलीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल झाला आहे. या परिसरात मुलींची छेड करण्याचे प्रकार वारंवार समोर येत असून रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. तसेच पीडित मुलगी आणि तरुण कोणत्या परिसरातील राहणारे आहेत याची मात्र खात्री झाली नाही. या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते. अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय, अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मुलींची छेड होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं आणि त्याला आळा घालावा, अशी मागणी आता स्थानिकांमधून जोर धरत आहे.