आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला किमान ४८५० ते कमाल ५४०० रुपये दर मिळाला व २१५० क्विंटलची आवक झाली. तर, कारंजा बाजार समितीत काल ५४०० पर्यंतच गेलेल्या दरात आज किंचित घसरण होऊन किमान ४९५० ते कमाल ५३२० इतका दर मिळाला व ४५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. कारंजात कालच्या तुलनेत आज ८० रुपयांची घसरण बघायला मिळाली.
तुरीच्या दरातही घसरण
सोयाबीनच्या दरवाढीची आशा फोल ठरत असताना आता तुरीच्या दरातही घसरण बघायला मिळत आहे. तुरीने काल अनेक बाजरपेठेत आठ हजारांचा टप्पा ओलांडला होता. कारंजात तर तुरीला सर्वाधिक ८१०० रुपये इतका कमाल दर मिळाला होता. आज मात्र तुरीच्या दरात १५० ते २०० रुपयांची घसरण झाली आहे. कारंजात आज ६७०० ते ७९०० रुपये व वाशिममध्ये ७१५० ते ७९२० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे निरीक्षक रामहरी वानखेडे यांनी दिली आहे.
हरभऱ्याची हमीभावा पेक्षाही कमी दराने विक्री
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ या वर्षासाठी ५३३५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या, मात्र बाजारात आलेल्या नवीन हरभऱ्याला किमान ३९७० ते ४६५७ इतका दर मिळत आहे. सरकारने जाहीर केलेल्या हमी दरापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. सरकारने लवकरात लवकर नाफेड मार्फत हमीभावानं हरभरा खरेदी व्हावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.