भातगाव तिसंग, गुहागर: कोणतीही गोष्ट मनावर घेतली तर अशक्य गोष्टीही सहज साध्य होतात. सर्व ग्रामस्थानी धडा घ्यावा असे कार्य भातगाव तिसंग येथील ग्रामस्थांनी करून दाखवले आहे. गुहागर तालुक्यातील अगदी टोकाच्या आणि दुर्गम मानल्या जाणाऱ्या तिसंग येथे आपल्या गावातील शाळेचे रूप पालटून शाळा अगदी सुंदर आणि सुस्वरूप केली आहे.
तिसंग येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. वेलेवाडी आणि डिंगणकरवाडी येथील ४२ मुले शाळेत शिक्षण घेत असून शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात आवड असलेले सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन सर्वांनी शाळेच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेतले. सर्वप्रथम शाळेचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्याचा संकल्प सर्व ग्रामस्थांनी घेतला आणि शाळेचे सगळे रंगकाम पूर्ण केले. सर्व काम ग्रामस्थानी स्वतः पूर्ण करण्यात पुढाकार घेतला. ‘पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ’ असे कितीतरी संदेश मुलांच्या नजरेत येऊ लागले. ABCD ,रंग, वार, महिने,तालुके सगळी माहिती नजरेसमोर राहू लागली. भिंतीवरील छान चित्रे पाहून मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागले. ग्रामीण भागातील शाळा असूनही शहरातील शाळांपेक्षा सुद्धा सुंदर आणि नटलेली शाळा पाहून प्रत्येकजण आनंदाने सुखावले आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळा डिजिटल झालेली असून शाळेत विविध उपक्रम साजरे केले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा ओळखली जाते आता सुंदर आणि स्वच्छ शाळा अशी या शाळेची ओळख निर्माण झाली आहे. डिंगणकरवाडी आणि वेलेवाडीच्या शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी यासाठी कसून प्रयत्न केले असून त्यांनी एक नवा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines