Maharashtra Pune News : पुणे :  देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune)  जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar)… पण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे.  भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं (Assam Tourism Department Office) यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.  

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये “भारतातील सहावं ज्योतिर्लिंग असलेल्या, कामरुप डाकिनी पर्वत, आसाम आपलं स्वागत आहे”, असा आशय असणारी जाहिरात आहे. याच जाहिरातीमध्ये विविध ज्योतिर्लिंग स्थळांची यादी देखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख ‘डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांचा फोटोही आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी  हस्तक्षेप करावा

दरम्यान, आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता चौफेर टीका होताना दिसत आहे. यावर सरकारनं भूमिका जाहीर  करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिर हे आसाममध्ये आहे, असा दावा केल्यानं भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी केली आहे.  भीमाशंकर मंदिर अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येते. आसामच्या मुख्यमंत्र्यांमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत, आपल्या भीमाशंकर मंदिराची सत्यता आसमच्या मुख्यमंत्र्यांना सांगावी, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. 

महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका

शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरे पण दुसरा राज्यामध्ये घेऊन जात आहेत का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका.”

महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात भीमाशंकर

महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे. या शिवधाममध्ये स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात शिव आणि दैत्य त्रिपुरासूर यांच्यातील युद्धात इतकी उष्णता निर्माण झाली की, भीमा नदी कोरडी पडली नंतर शंकरजींच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात आहे. सह्याद्री पर्वताच्या घाट भागात असून शिवाजीनगरपासून 127 कि.मी. अंतरावर आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here