raigad youth death, ३३ वर्षीय तरुणाने अचानक आयुष्य संपवलं; पोलीस तपासात कारण उघड – the 33 year old youth suddenly ended his life police investigation revealed the reason
रायगड : कोकणात अलीकडे आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच एक दुर्दैवी प्रकार रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात घडला आहे. महाड तालुक्यातील तांबट भुवन येथील एका ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, मृत सुमित बंडू मिंडे (रा. तांबडभुवन, वेताळवाडी, तालुका महाड) याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारूचे व्यसन असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारचा कामधंदा करत नव्हता. सुमित हा सतत दारूच्या आहारी गेलेल्या स्थितीत असायचा. यातूनच आलेल्या नैराश्यपोटी त्याने काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरामध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवले. आईसोबत लग्नाच्या शॉपिंगला गेला, रस्त्यात कंटेनरची धडक; रोशनची चटका लावणारी एक्झिट
या सगळ्या प्रकाराची माहिती महाड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाणे येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नाईक हे करत आहेत.