मुंबई महापालिकतील नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च, २०२२ रोजी संपला असून, गेल्या वर्षभरापासून पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. सन २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ व भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेची नगरसेवकसंख्या मनसेचे नगरसेवक फोडून तसेच पोटनिवडणूक, जातपडताळणीद्वारे ९५वर पोहोचली. तर भाजपचे ८२पैकी तीन नगरसेवक अपात्र ठरले असून, सदस्यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. पालिकेतर्फे नगरसेवकांना १ कोटी रुपये विकास निधी व ६० लाख रुपये नगरसेवक निधी दिला जातो. तसेच स्थायी समितीमार्फत प्रत्येक पक्षाला विशिष्ट निधीचे वाटप होते. वर्षभरात निवडणूक न झाल्याने यापैकी कोणताही निधी पालिका कायद्यानुसार माजी नगरसेवकांना मिळणार नाही. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपच्या माजी नगरसेवकांना लॉटरी लागली आहे. पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक प्रभागासाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक असलेल्या प्रभागांना झुकते माप देण्यात आले आहे.
दोन भाजप नगरसेवकांना १ कोटी
भाजपच्या दोन नगरसेवकांना मात्र प्रत्येकी तीन कोटी रुपये मिळालेले नाहीत. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक गोरेगाव येथील समीर देसाई यांची पत्नी व प्रभाग ५६च्या भाजप नगरसेविका राजुल देसाई व मुलुंड वॉर्ड क्रमांक १०५च्या रजनी केणी यांच्या प्रभागात प्रत्येकी एक कोटी रु.ची तरतूद करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या नगरसेवकांनाही १ कोटी
मुंबईत दहिसर येथील शीतल म्हात्रे, घाटकोपर येथील परमेश्वर कदम, वरळीचे संतोष खरात यांसह काही मोजक्याच नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीत या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी फक्त एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.