Kasba Bypoll in Pune | कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या पुण्यात जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रचारसभा घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला एकदिलाने लढण्याचे आवाहन केले होते.

हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी एकाचाही बॅनरवर फोटो नाही
- प्रशांत जगताप यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली
- महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता
कसबा विधानसभा मतदारसंघात लागलेल्या एका प्रचार फलकावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो गायब आहेत. या प्रचार फलकावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विश्वजीत कदम, ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आरपीआय गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांचे फोटो आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याचा फोटो या फलकावर नसल्याने महाविकास आघाडीत आता धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे.
या फलकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव जरी असलं तरी राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांपैकी कोणाचाही फोटो नाहीये. शरद पवार, जयंत पाटील किंवा अजित पवार यांचा कोणाचाही फोटो नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. स्वतः प्रशांत जगताप यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून कसब्यामध्ये त्यांनी प्रचाराचा अक्षरशः धडाका लावला आहे. ठिकठिकाणी त्यांच्या सभाही सुरू झाल्या आहेत. मात्र अशात आता प्रचार सभेत लावलेल्या बॅनर्सवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा फोटो गायब असल्याने महाविकास आघाडीत एकी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये ही निवडणूक आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे आणि जिंकायची आहे. त्यामुळे मानपानाचं कुठलाही नाट्य समोर न ठेवता रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे एकीकडे कसब्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून धंगेकर यांना ताकद देण्याचा पुरेपूर प्रयत्न असताना काँग्रेसकडून मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना का डावलण्यात आलं ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.