तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी) येथील लालू सोपान मोरे हा आपल्या बायको, मुलगा आणि सून यांच्यासोबत राहतो. त्याचा २३ वर्षीय मुलगा राकेश सोपान मोरे हा मासे विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, काल रात्री वडील लालू सोपान मोरे दारू पिऊन घरी आले होते. त्यांनी पत्नी मीराबाईकडे ५० रुपये पुन्हा दारू पिण्यासाठी मागितले. मात्र तिने नकार देताच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळात ते घरातून निघून गेले. नंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं असल्याचं मुलाने सांगितलं. मुलगा राकेश आणि सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले त्यावेळी आई घरात एकटीच झोपी गेली होती.
त्यानंतर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वडील लालू सोपान मोरे घरी आल्यानंतर त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने ४५ वर्षीय पत्नी मिराबाई लालू मोरेला मारहाण सुरू केली. लोखंडी मुसळने लालू मोरेने तिच्या डोक्यावर, तोंडावर जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा आवज ऐकून मुलगा आणि सून दरवाजा वाजवू लागले.
काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला, मी तुझ्या आईला मारून टाकलं, तुला काय करायचं ते कर, असं सांगितलं. राकेशने लगेच १०८ नंबरला कॉल करून ॲम्बुलन्स बोलावून घेतली. ॲम्बुलन्समधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मीराबाई यांना मृत घोषित केलं.
या प्रकारानंतर तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.