वाशिमच्या जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून १३ फेब्रुवारीला प्राप्त झालेल्या पत्रानुसार येडशी येथील भोंदू बाबावर कारवाई करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी आणि पोलीस घेऊन एका महिला कर्मचाऱ्यास बनावट केस म्हणून भोंदू बाबाकडे पाठविले. तिथे गेल्यावर त्या बाबाने महिला कर्मचाऱ्याला तुम्ही कशाला आले, तुम्हाला काय अडचण आहे असे विचारल्यावर महिला कर्मचाऱ्यानं भोंदू बाबांना सांगितले की, मला पहिली एक मुलगी आहे व आता मुलगा हवा आहे. उपाय सांगा. त्यावर त्यांनी तुम्हाला किती महिन्याचे दिवस गेले आहे व गरोदर आहात का असे विचारले असता महिला कर्मचारी यांनी त्यांना अडीच महिने झाले असे सांगितले.
यानंतर त्या बाबाने मंदिराच्या बाजूच्या रूममध्ये जावून कपुरी नागीलीच्या पानामध्ये साखरेचे बतासे देत माझ्या समोर हे औषध खा असे सांगितले. यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यानं ते औषध पान व त्यात दिलेले बतासे खाल्ले. त्या भोंदू बाबांनी या औषधाने तुम्हाला मुलगा होईल अशी खोटी बतावणी सांगितली. त्यानंतर फिर्यादी व पोलीस कर्मचारी भोंदु बाबा जवळ गेले असता त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव समाधान शिवलाल पवार वय ५० वर्ष रा. येडशी असे सांगितले. यावर त्यांना घेतलेल्या औषधाने नक्कीच मुलगा होईल का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, नकीच मुलगा होईल, असं सांगितलं.
संबंधित बाबातनं खात्री पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे औषध घेण्यासाठी दूर दुरचे लोक येतात जसे की, दिल्ली, सुरत येथून लोक येतात, असं सांगितलं. औषध घेतल्यामुळे मुलगा होतो म्हणुनच इतक्या दूर वरून लोक माझ्याकडे औषध घेण्यासाठी येतात असे त्या बाबांनी स्वतः सांगितले. याकरीता तुम्ही औषधाचे काही पैसे घेता का असे विचारले असता त्यावर त्यांनी माझ्या कडे गाई आहेत त्याकरीता लोक ढेप आणून देतात असे सांगितले.
बाबाच्या रूम मध्ये जावून पाहिले असता रूम मध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये साखरेचे बताशे, नागीलीचे पाने, रद्दीचे पेपर व एका स्टीलच्या डब्यामध्ये चार छोट्या प्लास्टीकच्या बॉटलमध्ये वेग वेगळ्या प्रकारचे औषध मिळाले ते औषध पोलिसांनी पंचनामा करून पंचांसमोर जप्त केले. या बाबाविरुद्ध पोलिसांनी कलम ४२०,४०६ भारतीय दंड संहिता १८५० चे सहकलम ३३ ( १, २) महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम १९६१ वैद्यकीय परवाना नसताना वैद्यकीय सेवा देणे, तसेच कलम ३, ४, ५, ६ औषधी आणि चमत्कारी उपचार अधिनियम १९५४ वैद्यकीय परवाना नसतांना औषधीची जाहिरात करणे, औषधी देणे, चमत्कारी उपचार करणे या कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय मंजुषा मोरे करत आहेत.