jalgaon groom car fire, VIDEO | नवरदेवासह निघालेल्या गाडीला आग, तासात कार जळून खाक, ड्रायव्हरमुळे पाच जीव वाचले – maharashtra accident news today jalgaon groom car catches fire while going for wedding
जळगाव : नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घटना मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील कजगाव येथे हा प्रकार घडला आहे. सुदैवाने वेळीच आगीचा प्रकार कार चालकाच्या लक्षात आल्याने या घटनेत नवरदेवासह गाडीतून प्रवास करणारे पाचही जण बचावले आहेत. आगीच्या घटनेत काही वेळातच कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. या विवाह सोहळ्यासाठी स्वतः नवरदेव रोहन डेंडूळे यांच्यासह आकाश शिवदास डेंडूळे, वैशाली अमर बागरे व चालक राहुल वैराळे असे पाच जण एम.एच २७ बी .व्ही. ७९५६ या क्रमांकाच्या कारने अमरावती येथून मालेगाव येथे जात होते. यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव गावाजवळ कारची वायर जळाल्याचे कार चालक राहुल वैराळे याच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली. कारमधील नवरदेव तसेच इतर चार जणांना बाहेर उतरविले, आणि तो स्वतः सुद्धा बाहेर पडला. सर्व जण बाहेर पडताच कारला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. रस्त्यावर ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी दुसरे काही साधन नसल्याने कारला लागलेली आग विझविता आली नाही.