१४ फेब्रुवारी रोजी एकीकडे अदानी एंटरप्रायझेसचे डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले ज्यात कंपनीला जोरदार नफा झाला. तर दुसरीकडे मॉरिशसमधून अदानी समूहासाठीही आनंदाची बातमी आली. या सकारात्मक बातम्यांचा परिणाम आज अदानीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. अदानी ग्रुपचे १० पैकी ६ स्टॉक्सचा हिरव्या चिन्हात व्यापार होताना दिसत आहे. बाजार उघडताच अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी विल्मर, एसीसी सिमेंट, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही या कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी पकडली.
अदानींच्या शेअर्सची स्थिती
सध्या बातमी लिहीपर्यंत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १७९०.६० वर वाढून व्यवहार करत आहे. तर अदानी पोर्ट्सचा शेअर ५७२.०० च्या पातळीवर दिसत आहे. याशिवाय, अदानी विल्मारचा शेअर ५.७५ रुपयांनी वाढून आज ३९९.१५ रुपयावर चढया. तसेच ACC लिमिटेडचे शेअर्स १८५९ वर, अंबुजा सिमेंटने वेगाने ३४५.७० रुपयावर उसळी घेतली आहे. तर NDTV चा स्टॉक १९३.४० वर ट्रेड करत आहे. मात्र, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅसचे समभाग लाल चिन्हात व्यवहारास सुरुवात केली. अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर या स्टॉक्सवर ५% टक्के लोअर सर्किट लागले आहे.
अदानींचा क्लीन चिट
हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहावर फेरफार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले, पण मॉरिशसच्या नियामक वित्तीय सेवा आयोगाने (FSC) त्यांना क्लीन चिट दिली. एफएससीने म्हटले आहे की, कंपन्यांच्या निधीचा गैरवापर झाला नाही किंवा अदानीने नियमांचे उल्लंघन केले नाही. नियामकाने अदानी समूहाला क्लीन चिट देत म्हटले की ३८ समूह कंपन्या आणि ११ समूह निधीमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. दरम्यान, अदानी ग्रुपच्या प्रमुख कंपनीच्या उत्कृष्ट निकालामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.
गौतम अदानी यांनी अलीकडेच स्वत: पुढे येऊन आपल्याकडे निधीची कमतरता नसल्याचे सांगितले. याशिवाय अदानी ग्रुपने कर्ज परतफेडीबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.या सर्व गोष्टींचा कंपनीच्या गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत असून त्याचा परिणाम आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येतोय.