अमरावती येथील दहीसाथ चौक, सात खिराडी येथील २४ वर्षीय युवक सुप्रभ उज्वल राऊळ हा गेल्या चार ते पाच वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण होता. तो शहरातील एका नेपरोलॉजिस्टकडे उपचार व किडनी डायलिसिस घेत होता. परंतु, किडनी प्रत्यारोपणाशिवाय त्याला काही उपाय नसल्याने अखेर जन्मदात्या आईनेच पुढाकार घेत आपल्या मुलाला किडनी देण्याचा निर्णय घेतला.
सुप्रभला त्याची आई संगीता उज्वल राऊळ (वय ४७ वर्ष) यांनी आपली एक किडनी देऊन मुलाला जीवनदान दिले. ही प्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. नीलेश पाचबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
‘रुग्णालयाचे युरो सर्जन, डॉक्टर राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, डॉ. प्रतीक चिरडे व डॉ. सुधीर धांडे यांनी सर्जन म्हणून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. बधीरीकरण तज्ञ म्हणून डॉ. जफर अली, डॉ. प्रणित घोनमोडे, डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. रोहीत हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. नंदिनी देशपांडे यांनी भूलतज्ञ म्हणून आपली भूमिका निभावली. यावेळी नेपोलॉजिस्ट डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. प्रणित काकडे हेदेखील उपस्थित होते. यात किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी व समाजसेवा अधीक्षक सतीश वडनेरकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली.
गजानन महाराज प्रकटदिनी खासदार अमोल कोल्हे भक्तांच्या सेवेत, पंगतीत आपुलकीनं वाढलं जेवण