गुन्ह्यातील अनोळखी मृत महिलेचा संपूर्ण महाराष्ट्रमधील पोलीस ठाण्यामध्ये तपास करण्यात येत होता. बेपत्ता महिलेबाबत चौकशी करत असताना मुंबई पोलीस आयुक्तालयातील ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या बेपत्ता महिलेचे वर्णन व नमूद गुन्ह्यातील मृत महिलेच्या वर्णनामध्ये साम्य असल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई यांनी प्रत्यक्ष ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे जाऊन बेपत्ता महिलेची तक्रार देणारे पती अखिल फकीर मोहमंद हाशमी यांच्याकडे चौकशी केली. बेपत्ता महिला आपली पत्नी असल्याचे सांगून तिचे नाव सायदा बानू हासिम (वय ३३ वर्षे, व्यवसाय सफाई कामगार, राहणार भीम नगर रहिवाशी सेवा संघ महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई, ८८) असे असल्याचे त्याने सांगितले.
चौकशी दरम्यान सदरची महिला ही जुईनगर येथे हाऊस कीपिंगचे काम करत होती, असे मृत महिलेच्या पतीकडून समजले. तसेच मृत महिलेचा मोबाइल प्राप्त करण्यात आला. आणि त्या अनुषंगाने गुन्ह्यात जलद गतीने तपासाची चक्र फिरवून तांत्रिक तपास करून काही संशयित इसमांचे नंबर मिळवण्यात आले. त्यामध्ये राजकुमार बाबुराम पाल (वय ४० वर्षे, धंदा वॉचमन, सध्या कौशिका सोसायटी वॉचमन, रूम नंबर २९, वाशी नवी मुंबई) येथे काम करत होता. तसेच हा आरोपी मूळचा राहणार मु. खरका खास पो. खीरी ता. कोराव, इलाहाबाद येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी संशयित आरोपीचा मागोवा घेऊन कौसिका सोसायटी सेक्टर २९ वाशी येथून त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्यातील मृत महिला तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात आली. मृत महिला सायदा बानू हासमीने आपल्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. यामुळे तिचा पिच्छा सोडविण्यासाठी तिला कोपरखैरणेमधील कांचनगंगा सोसायटीच्या समोरील नाल्यालगत खाडीकडे जाणाऱ्या अरुंद रोडच्या डाव्या बाजूला झाडाझुडपामध्ये भेटण्यास बोलावले. आणि तिथे तिची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याबाबतची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह पोलीस आयुक्त संजय मोहिते अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. ४८ तासांच्या आत कोपरखैरणे पोलीस ठाणेमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आरोपीला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.