Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Feb 2023, 7:50 am
Mahesh aher audio clip gone viral | गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात जितेंद्र आव्हाड विरुद्ध भाजप-शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच एका महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

हायलाइट्स:
- आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
- आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप
- आहेर यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक असल्याचा दावा केला आहे
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचा कट रचला जात असल्याची खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ही क्लिप ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहे यांची असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी महेश आहेर यांना पालिका मुख्यालयात गेटवर लाथाबुक्क्यांनी चोप दिला. या प्रकरणी महेश आहेर यांना मुका मार लागला असून त्यांच्यावर ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी महेश आहेर यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार नोंदवली आहे. आहेर यांनी आपल्यावर झालेला हल्ला हा प्राणघातक असून या वेळी सांगितले की, आपण आव्हाड यांच्या मतदार संघात केलेल्या बेकायदेशीर बांधकाम तोडल्या प्रकरणी मनात राग धरून आव्हाड यांच्या सांगण्यावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदूक आणि चॉपरच्या सहाय्याने वार करण्याच्या हेतूने हल्ला केला असल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे. हा हल्ला केला असून या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांचे पीए अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व इतर ३ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर तीन जणांनी आहेर यांच्यावर बंदूक आणि चॉपरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षारक्षक आलेले पाहून या तिघांनी पळ काढला आणि जाता जाता तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे देखील आहेर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार हा मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मारहाणीची तक्रार नमूद झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी तपासला सुरुवात करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.
महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला दुखापत पोहचवण्यासाठी कट रचला असल्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिप मधील व्यक्तीचा आवाज हा महेश आहेर यांचाच असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी निश्चितच चौकशी करावी, परंतु हा आवाज महेश आहेर यांचाच आहे यात दुमत नसल्याचे ऋता आव्हाड म्हणाल्या. इतक्या खालच्या थराला जाऊ एखाद्या बद्दल इतकं वाईट बोलायचं. पैशाच्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं आहे. एवढे सगळे पुरावे या क्लिपच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासन यावर त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. या घटनेवरून मला दुःख होत नसून आश्चर्य वाटत आहे. जर आता या प्रकरणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर न्यायालयीन कारवाई लढणार असल्याचे ऋता आव्हाड यांनी सांगितले.
हे कृत्य महेश आहेर यांचा नीचपणा आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील ऋता आव्हाड यांनी विनंती केली आहे की, महेश आहेर हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने देखील लोकांना धमक्या देत असतात आणि तशा तक्रारी लोक आमच्याकडे देत असतात. थोडी तरी जनची नाही तर मनाची लाज असेल तर या क्लिपिंगवर कारवाई करावे अशी मागणी देखील ऋता आव्हाड यांनी केली आहे. ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट रचला असल्याची धक्कादायक क्लिप समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई कारवाई अन्यथा आणि न्यायालयाचे दरवाजे ठोकणार असल्याचा इशारा ऋता आव्हाड यांनी दिला आहे. वर्तकनगर पोलिसांनी तक्रार नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासला सुरुवात केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.