परभणी : आईला भेटण्यासाठी निघालेल्या मुलाचा दुचाकी अपघातात छातीला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या सेलू ते सतोना या रस्त्यावर घडली आहे. तर या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आलं आहे. सचिन नारायण जोगदंड असं अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातील विकास नगर येथे राहणारे सचिन नारायण जोगदंड हे औरंगाबाद येथून आपल्या आईला भेटण्यासाठी परभणीकडे येत होते. मात्र त्यांची दुचाकी सेलू- सातोना रस्त्यावर आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये सचिन जोगदंड यांच्या छातीला दुचाकीचे हँडल लागल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांनी जागी. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख उस्मान, शिवदास सूर्यवंशी, राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सचिन जोगदंड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. या अपघातामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली आहे.मयताच्या भावाचाही अपघाती मृत्यूमयत सचिन जोगदंड यांचे मोठे भाऊ विजय जोगदंड यांचाही काही वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. तर आता आईला भेटण्यासाठी येत असताना सचिन जोगदंड यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने जोगदंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here