नासीर यांच्याकडे १५ एकर शेती आहे.आई, वडील, पत्नी, मुलं असं त्यांचं कुटूंब असून शेतातून कमी उत्पन्न मिळायचं. सुरुवातीला शास्त्रशुद्ध शेती करण्याचं तंत्र त्यांना माहीत नसल्याने आई वडील पारंपरिक शेतीत राबायचे तर नासीर शेख गवंडीकाम करत ठेकेदारी करायचे. हळू हळू आई वडिलांना मदत म्हणून नासीर शेतीत लक्ष द्यायला लागले आणि त्यांचं मन शेतीत रमलं.
पारंपारिक पिकांच्या व्यतिरिक्त नवनवीन काय करता येईल याची माहिती घेऊ लागले. सुरुवातीला मोसंबी आणि सीताफळ लागवड केली, पण सगळं टिकवायचं तर पाणी पाहिजे म्हणून शेतातील जुनी विहीर पुन्हा खोदली.ते पण पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी आपल्या शेतात सव्वा एकर जमिनीवर सव्वा कोटी लीटरचे शेततळे तयार करून घेतले आणि पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सोडवला.
या काळात त्यांच्या रांजणी येथील मित्राने पपई लावण्याचा सल्ला दिला. मित्रांनी केलेली पपईची यशस्वी लागवड पाहून गेल्या वर्षी म्हणजे आजच्या वर्षाला १५ फेब्रुवारी २०२२ रोजी नासीर यांनी आपल्या २ एकर शेतीत पपईच्या २ हजार रोपांची लागवड केली.त्याला सेंद्रीय पद्धतीची जोड दिल्याने त्यांचा हा हटके प्रयोग यशस्वी तर झालाच शिवाय त्यांना आता चांगले उत्पन्न देखील मिळवून देत आहे.
नासीर शेख यांनी परांडा येथील शेतकऱ्याकडून ११ रुपये प्रति नग या भावाने “१५ नंबर” व्हरायटीची २ हजार रोपे आणली. तशी त्यांना इतरही पपईच्या वाणांची माहिती होती, पण, व्हायरस च्या प्रभावाने त्या वाणांचे उत्पन्न कमी होते याची माहिती असल्याने त्यांनी “१५ नंबर” या वाणाचीच निवड केली, कारण या वाणाची पपई ही तोडणी नंतर जास्त काळ टिकते.त्यामुळे आलेला माल दूर अंतरावरील व्यापारी सहज घेऊन जाऊ शकतात.
अखेर १५ फेब्रुवारीला लागवड केलेल्या पपईला ठिबक द्वारे पाण्याचे योग्य नियोजन केलं. या सगळ्यांचे फलित म्हणून आलेल्या पपईंची नोव्हेंबर २०२२ पासून तोडणी सुरू झाली असून आता पर्यंत ३२ टन पपई विक्री झाली आहे. व्यापाऱ्यांनी तिला २० रुपये किलो या दरानं नासीर शेख यांच्याकडून पपई खरेदी केली. ही पपई तोडणी नंतर जास्त दिवस टिकणारी असल्यामुळे दिल्ली,पंजाब मधील व्यापारी येथून पपई घेऊन जात आहेत.
आता पर्यंत ३२ टन पपई विकली असून येत्या काळात अजून किमान ३२ ते ३५ टन पपई निघेल, असे नासीर शेख सांगतात. एकंदरीत त्यांना पूर्ण हंगामात ६० ते ६५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.यातून त्यांचे आर्थिक समीकरण जुळून आल्याने नसीर शेख आपल्या शेतीतील प्रयोगाने खुश आहेत. जवळपास ६.५० ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
नासीर शेख यांनी मल्चिंगचा वापर केल्यामुळं पाण्याची मोठी बचत झाली. पाणी, योग्य खताचे व्यवस्थापन,सेंद्रीय पद्धतीचा वापर,कीडरोग नियंत्रण,आंतरमशागत अशा कामासाठी त्यांचा साधारण १ लाख रुपये खर्च आला असून आत्तापर्यंत त्यांना ५ ते ५.५० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अजूनही झाडांवर ३० ते ३२ टन माल शिल्लक आहे त्यातून कमीत कमी ३ ते ४ लाखाचे उत्पन्न हाती पडणार आहे असं नासीर शेख सांगतात.