या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे, सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी गावात माहिती घेतली असता सदर मृतदेह पिंपरखेड येथील सुरेश शामराव गुंजकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र श्वान पथक आरोपीचा माग काढू शकला नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणल्याचे सांगण्यात आले. मयत सुरेश गुंजकर हे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर पडले होते. गावातील काही व्यक्तींनी त्यांना यावेळी पाहिले. मात्र त्यानंतर ते कुठे गेले व कोणासोबत गेले याचा शोध लागला नाही. मयत सुरेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून गुंजकर दांम्पत्य रोजमजुरी करून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान, पिंपरखेड येथील खून प्रकरणांमध्ये मृत सुरेश गुंजकर यांचा भाऊ गजानन गुंजकर यांनी रात्री उशिरा बासंबा ठाण्यात तक्रार दाखल केली. यात सुरेश यांचा त्यांची पत्नी कविता गुंजकर व सुमित ऊर्फ चिंट्या पुंडगे यांनी मंगळवारी रात्री ७.३० ते बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या कालावधीत खून केल्याचे नमूद केले. यावरून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. सदरील घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल, संशयित पोलिसांच्या ताब्यात