गेल्या वर्षी १९ ऑगस्ट २०२२ रोजी गौतम अदानी यांनी डीबी पॉवर कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ ची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली, जी नंतर १५ जानेवारी २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. पण तरीही व्यवहार पूर्ण होऊ शकलेला नाही आणि आता अखेरीस हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी जेव्हा DB पॉवर अधिग्रहणाचा करार जाहीर झाला तेव्हा तो अदानी समूहाचा वीज क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विलीनीकरण आणि अधिग्रहण करार होता. पण २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चच्या आफ्टरशॉकशी अदानी समूह अजूनही झुंज देत असल्यामुळे हा करार वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.
हिंडेनबर्गचे आफ्टरशॉक
अमेरिकन शॉर्ट सेलर फर्मचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला पूर्ण सबस्क्राईब झालेला २० हजार कोटींचा एफपीओ मागे भाग पडले होते.
अदानी पॉवरवर कितीचे कर्ज
अदानी समूह आतापर्यंत हजार कोटींच्या कर्जात बुडालेला आहे. अदानी पॉवरची एकूण स्थापित क्षमता १३.६ गिगावॅट आहे. कंपनीचे सात राज्यात थर्मल प्लांट तर ४० मेगावॅटचा सोलर प्लांट आहे. ३० सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार कंपनीवर एकूण ३६ हजार ०३१ कोटींचे कर्ज आहे. दरम्यान अदानी पॉवर आणि डीबी पॉवरमधील करार पूर्ण झाला असता, तर अदानी समूहाचे ऊर्जा क्षेत्रात स्थान आणखी मजबूत झाले असते. डीबी पॉवरचे छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात प्रत्येकी ६०० मेगावॅटचे दोन युनिट असून सध्या या कंपनीची मालकी दैनिक भास्कर समूहाकडे आहे. या कंपनीवर ५,५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे.