Kasba byelection Girish Bapat | कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेली अनेक वर्षे गिरीश बापट हे कसब्यात निर्विवादपणे वर्चस्व राखत आहेत. पण आजारपणामुळे गेल्या काही काळापासून ते राजकारणापासून दूर आहेत.

हायलाइट्स:
- कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम
- हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर
- भाजपने प्रचारासाठी सर्व ताकद पणाला लावली
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत रंगणार आहे. गेली अनेक वर्षे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, यंदा भाजपने कसब्यातून ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याने येथील ब्राह्मण समाज नाराज आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपला अवघड जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता कसब्यातील सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. कालच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी अनपेक्षितपणे कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कसब्यातील आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात गिरीश बापट भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयासाठी कोणता कानमंत्र देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गिरीश बापटांनी प्रचारातून का माघार घेतली होती?
आजारपणाच्या कारणास्तव मी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असे पत्रक काही तासांपूर्वीच गिरीश बापट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप कमी काम केले आहे. तरीसुद्धा आजघडीला मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. परिणामी मी कसबा पोटनिवडणुकीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असे गिरीश बापट यांनी पत्रकात म्हटले होते.
मी इथे बसलोय, कसब्याची चिंता करु नका: गिरीश बापट
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गिरीश बापट यांनी भेट घेतली होती. तेव्हा कसबा पोटनिवडणूक भाजपच जिंकेल, तुम्ही चिंता करु नका, असा शब्द बापटांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. ‘कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय होईल, असे गिरीश बापट यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.