क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत वांद्रे पश्चिम येथील व्यावसायिक आशिष यादव व त्यांचे मित्र बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. पृथ्वी शॉ ला पाहून याच हॉटेलमध्ये असलेले सना गिल व शोबित ठाकूर हे त्याच्याजवळ गेले आणि सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. पृथ्वीने त्यांच्यासोबत सेल्फी काढलाही मात्र ते वारंवार सेल्फी काढण्याची मागणी करू लागले. पण यासाठी त्यांना मनाई करतानाच आशिष यांची गिल आणि ठाकूर यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने गिल आणि ठाकूर यांना हॉटेलमधून बाहेर काढले. संतापलेल्या गिल व ठाकूर यांनी फोनद्वारे इतर मित्रांना त्या ठिकाणी बोलावले. या सर्वांनी आशिष यादव यांच्याशी वाद घालत त्यांच्या बीएमडब्ल्यू कारचा पाठलाग केला. ओशिवरा परिसरात असलेल्या लोटस पेट्रोल पंपजवळ बेसबॉल स्टीकने यादव यांच्या कारची पुढील बाजूची व मागची काच फोडली. यादव यांच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून कार सरळ ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर आणली.
पोलिस ठाण्याजवळही गिल आणि ठाकूर यांनी यादव आणि त्यांच्या चालकासोबत वाद घातला. इतकेच नाही तर प्रकरण मिटवायचे असेल तर ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु यादव यांनी त्यांचे काहीही न ऐकता थेट पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला.