भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड
एअर इंडियाच्या विमान खरेदीच्या ऑर्डरची ताजी माहिती टाटा समूहाच्या एअरलाइन्सचे मुख्य अधिकारी निपुण अग्रवाल यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. अग्रवाल म्हणाले की, एअर इंडियाची विमाने खरेदी करण्याची ऑर्डर ही भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मैलाचा दगड आहे आणि जगभरात ज्या प्रकारचा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये ऑर्डरचा तपशील देताना त्यांनी लिहिले, “४७० विमाने खरेदी करण्याच्या फर्म ऑर्डरव्यतिरिक्त, त्यात पुढील दशकात एअरबस आणि बोईंगकडून आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचे पर्यायी अधिकार देखील समाविष्ट आहेत.”
एअर इंडियाची ही ऑर्डर एव्हिएशन उद्योगाच्या आधुनिक इतिहासातील कोणत्याही एका विमान कंपनीने दिलेल्या सर्वात मोठ्या ऑर्डरपैकी एक मानली जाते. मंगळवारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एअर इंडियाच्या विमान खरेदीच्या ऑर्डरचे कौतुक केले आणि याला ऐतिहासिक करार म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही अमेरिकन कंपनी बोईंगला दिलेल्या ऑर्डरचे स्वागत केले असून ते दोन्ही देशांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
एअर इंडियाची १७ वर्षांत प्रथमच ऑर्डर
एअर इंडियाने गेल्या १७ वर्षांनंतर प्रथमच विमान खरेदीची ऑर्डर दिली आहे. यापूर्वी २००५ मध्ये एअर इंडियाने १११ विमाने खरेदीची ऑर्डर दिली होती. त्यावेळी ती सरकारी कंपनी होती. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये, मोदी सरकारने टाटा समूहाला एअर इंडिया ही भारत सरकारची कंपनी विकली. टाटा समूहाने एअर इंडियाला पुनरुज्जीवित करण्याच्या आपल्या योजनेचा एक भाग म्हणून ही ऐतिहासिक ऑर्डर देऊन भविष्यासाठी आपले महत्त्वाकांक्षी हेतू अधोरेखित केले आहेत.