सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये कापूस आणि अकोल्याच्या कृषी बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली आहे. १४ फेब्रुवारीला अकोटच्या बाजारात कापसाला ८ हजार २९५ ते ८ हजार ७७० रूपये प्रति क्विंटल इतका भाव होता. १५ फेब्रुवारीला ८ हजार ३०० पासून ८ हजार ८४५ प्रतिक्विंटल प्रमाणे कापसाला भाव मिळाला असून आज या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. आज कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ३१५ पासून ८ हजार ८५० रुपयांपर्यत भाव मिळाला. तर आवक चांगली झाली असून ३ हजार ४०० क्विंटल इतका कापूस खरेदी झाला आहे. आता शेतकऱ्यांचा घरात साठवून ठेवलेला कापूस थोडा थोडा करून बाजारात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचा भावात सातत्याने होत असलेली घसरण पाहता शेतकरी चिंतित होता. परंतु आता पुन्हा पांढरे सोने चकाकल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कापसाचे भाव वाढेल या आशेने घरी साठवून ठेवलेला कापूस गरजेपोटी आता शेतकऱ्यांना मिळेल ‘त्या’ भावाने विकावे लागत आहे. अजूनही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस साठवलेला आहे. आता बाजारात हळूहळू कापसाची आवक वाढत आहे. दरम्यान सद्यस्थितीत कापसाच्या भावात जास्त घसरण होणार नाहीय. येत्या काही दिवसात कापूस दरात आणखी सुधारणा दिसू शकणार, असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केला आहे.
तुरीच्या दरात ४६० रुपयांनी वाढ
अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी बाजारात आज १ हजार ८६५ इतकी तुरीची आवक झाली आहे. काल तुरीला ६ हजार ७०० पासून ७ हजार ९३५ प्रतिक्विंटरप्रमाणे भाव होता. परंतु आज तुरीच्या दारात वाढ झाल्याने हे दर ७ हजार ६०० ते ८ हजार ३९५ रूपांपर्यंत प्रतिक्विंटल होते. आता तुरीची आवकही वाढली अकोल्याच्या कृषी बाजारात ६ हजार ९०० इतकी क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. तर तुरीला सरासरी भाव ७ हजार ५०० रूपये इतका होता. आणि कमीत कमी भाव ६ हजार ९०० पासून ८ हजार ७० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे मिळाले.