म. टा. प्रतिनिधी । नगर

‘शेतीला जोडधंदा म्हणून उपयुक्त असलेल्या दूध व्यावसायाकडे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. दूध दरासाठी इशारा आंदोलन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या दोन बैठका झाल्या, तरीही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचे दूध संघही कमी दराने दूर खरेदी करीत आहेत,’ असा आरोप माजी मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

दूध दराच्या प्रश्नावर १ ऑगस्टपासून दूध संकलन बंद ठेवण्याचे आंदोलन विविध शेतकरी संघटनांनी पुकारले आहे. भाजपनेही या आंदोलनात भाग घेतला आहे. यासंबंधी बोलताना विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या समस्‍या दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. शेतीला जोडधंदा म्‍हणून दूध व्‍यवसाय शेतकऱ्यांना आधार ठरला आहे. मात्र, या व्‍यवसायाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. करोनाच्या संकटामुळे दूध उत्‍पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. राज्‍यात आता दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्याही आत्‍महत्‍या सुरू झाल्‍या आहेत. त्‍याच्‍याही संवेदना या सरकारला राहिलेल्‍या नाहीत. करोनाच्या संकटात दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २५ रुपये हमीभाव देण्‍याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्‍यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.’

वाचा:

‘सरकारच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकारमधील काही मंत्र्यांच्‍या दूध संघांनीच कमी दरात दूध खरेदी करण्‍याची भूमिका घेतली आहे. हा एकप्रकारे उत्‍पादकांवर अन्‍याय आहे. दूध उत्‍पादकांचे आंदोलन झाल्‍यानंतर सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. परंतु, मंत्रिमंडळाच्‍या दोन बैठका होऊनही सरकार कोणताही ठोस निर्णय घेऊ शकले नाही. ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय मोडीत काढण्याचे पाप हे सरकार करीत आहे. त्यामुळेच एक ऑगस्टला ठरल्याप्रमाणे भाजपतर्फे आंदोलन होणार आहे. नगर जिल्ह्यातील आंदोलन राहाता येथे नगर- मनमाड महामार्गावर करण्यात येणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here