पुणे: भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या पोट निवडणुकीमध्ये भाजपने टिळक कुटुंबीयात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसू शकतो, अशी शक्यता असताना आता भाजपने आपला हुकमी एक्का अखेर मैदानात उतरवला आहे. ‘पुण्याची ताकद , गिरीश बापट’ यांनी आजारी असताना देखील आज हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

नाकात नळी, ऑक्सिजन सिलेंडर तरीही व्हिलचेहेरवरुन गिरीश बापट हे कसबा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. त्यामुळे ते कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारात कुठेही सहभागी झाले नाहीत. ‘गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप कमी काम केले असून मला सद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. या कारणास्तव पोट निवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही’, असं बापट यांनी स्पष्ट केलं होतं.

कसबा पोट निवडणूक प्रचार; वाहन चालकावर संशय, तपासणी करताच पाच लाखांची रोकड सापडली…
मात्र, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी स्वतः प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक ही अवघड जात आहे. त्यामुळे पुण्यातील लोकनायक म्हणून ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांची एन्ट्री भाजपसाठी कुठेतरी दिलासा देणारी आहे.

पुण्यात १९९५ पासून पुढील २५ वर्ष गिरीश बापट यांनी एक हाती आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. कसब्यात गिरीश बापट यांचं एकमुखी नेतृत्व होतं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि मुक्ता टिळक या कसबा पेठमधून आमदार झाल्या. असं असलं तरी मतदारसंघावर गिरीश बापट यांचाच वरचष्मा होता.

सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाणं आणि कसब्यातील सामान्य लोकांच्या खांद्यावर हात ठेवून त्याची विचारपूस करणे, हीच गिरीश बापट यांची स्टाईल त्यांना कसब्याचा राजा बणवून गेली होती. विधानसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कधीही झुंजावं लागलं नाही. मात्र, आता टिळकांच्या घरात उमेदवारी न दिल्याने मतदार संघातील ब्राम्हण समुदायाला पचत नाहीये. यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे.

पेट्रोल भरुन परतत होते, तेवढ्यात अनर्थ घडला, डॉक्टर दाम्पत्याचा संसार क्षणात उद्ध्वस्त
त्यामुळे भाजपने आता आपला हुकमी एक्का बाहेर काढत स्वतः गिरीश बापट यांनाच मैदानात उतरवला आहे. मात्र, नाकात नळी, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिलचेअरवर बसून बापट यांना पक्षासाठी प्रचार करावा लागत आहे. मात्र, प्रकृती इतकी अस्वस्थ असताना बापटांना प्रचार करायला लावणं हीच गोष्ट कसब्यातील मतदारांना काही केल्या रुचत नाहीये.

आधी मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेची परीक्षा घेतली आणि आता गिरीश बापट यांच्यासारख्या लोकनेत्याच्या पक्ष निष्ठेची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, तिकीट देण्याची वेळ आल्यानंतर इतर उमेदवार भाजप समोर करत आहे, अशी खंत कसब्यातील काही नागरिकांनी बोलून दाखवली आहे. मात्र, आता कसब्यातील या घायाळ वाघाचा प्रचार भाजपला तारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here