Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Feb 2023, 8:14 am
msrtc employees monthly salary | एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्यामुळे सामान्य कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरुन ‘सामना’तून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावणारे आता कुठल्या बिळात लपून बसलेत?
- कवठेमहांकाळ येथील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांची आत्महत्या
- सरकार आता भीमराव सूर्यवंशी यांच्या आत्महत्येचे काय प्रायश्चित घेणार?
या अग्रलेखातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीर्घकाळ सुरु असलेल्या एसटी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावून आंदोलन करणारे ‘वकील’ आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत? आता त्यांची ती ‘डंके की चोट’ की काय होती ती कुठे गायब झाली? दीड वर्षांपूर्वी ‘गुण’ उधळणाऱ्या या महाशयांना आता एसटी कर्मचाऱ्यांनी ‘चौदावे’ रत्न दाखवायला हवे. कारण वेळेत वेतन न मिळूनही ‘आमचेच सरकार पगार देणार, आमच्या सरकारकडून आम्ही पगार घेणार’ अशा उलट्या बोंबा हे महाशय मारत आहेत, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.
राज्यातील विद्यमान डबल इंजिन सरकारने विकासकामांचा धडाका लावला आहे. पण कवठेमहांकाळ येथील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांनी पगार वेळेवर झाला नाही म्हणून आत्महत्या केली. गेल्या महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देऊन त्यांची ‘संक्रांत’ गोड केली अशा बढाया मारणारे शिंदे फडणवीस सरकार आता भीमराव सूर्यवंशी यांच्या आत्महत्येचे काय प्रायश्चित घेणार आहे, असा सवाल ‘सामना’तून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला आहे.
न्यायालयात आश्वासन देऊनही एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन नाही: सामना
दीड वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज सत्तेत सहभागी असलेल्या मंडळींना पुतना मावशीचा पान्हा फुटला होता. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारविरोधात चिथावणारे, महिन्याचे वेतन वेळेत देण्याचे वचन देणारे आणि एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या त्या आंदोलनातील कळीच्या मुद्दयावर आपल्या राजकीय पोळया भाजून घेणारेच आज सत्तेतील भागीदार आहेत. तरीही एसटी कर्मचाऱ्यांची दर महिन्याच्या पगाराची रडकथा तशीच आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे बजेटमध्ये तरतूद केली जाईल आणि महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन दिले जाईल, असे सरकारनेच न्यायालयात कबूल केले आहे. मात्र, त्याचा आता राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. मागील सहा महिन्यांच्या वेतनातील थकित रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी एक हजार कोटी रुपयांची लेखी मागणी एसटी महामंडळाने गेल्या महिन्यातच राज्याच्या अर्थ विभागाकडे केली आहे. आता फेब्रुवारीची १५ तारीख उलटली तरी ही थकित रक्कम सोडा, चालू महिन्याचे वेतनही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, याकडे ‘सामना’तून लक्ष वेधण्यात आले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.